कोनगाव येथील पाच महिलांची भोंदू महिलेने भूलथापा मारून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
भिवंडी- कोनगाव येथील पाच महिलांची भोंदू महिलेने भूलथापा मारून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात शारदा (५०) या भोंदू महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदाने कोनगाव येथे राहणा-या भाग्यश्री म्हात्रे आणि तिची बहीण स्मिता म्हात्रे या दोघींना विवाह जमवून देऊ, असे सांगून विधीच्या नावाखाली गव्हाची कणिक तयार करून त्यात त्यांना सोन्याचे दागिने ठेवण्यास सांगितले होते. मात्र शारदाने हातचलाखीने हा ऐवज लांबवून या दोघींची फसवणूक केली आहे.
तर मंदा म्हात्रे, सुभद्रा कराळे या दोन महिलांना शारीरिक व्याधी जडीबुटीने दूर करू व ज्योती कराळे या महिलेला तिच्या माहेरच्या घरातील भूतबाधा व पिशाच्च बाहेर काढून घरात सुख नांदवू, असे सांगून या तिघांकडून लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले होते.
मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या पाचही जणींनी कोनगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन शारदाविरोधात तक्रार दाखल केली.