डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपये ५० पैसे तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे एक रुपयाहून कमी किमतीची कपात होणार आहे.
नवी दिल्ली– डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपये ५० पैसे तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे एक रुपयाहून कमी किमतीची कपात होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमतींनी २७ महिन्यांचा नीचांक गाठल्याने लवकरच डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीमध्ये कपात होणार आहे.
मात्र ही कपात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात १५ ऑक्टोबर रोजी होणा-या मतदानानंतर जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमतीमध्ये यावर्षभरात १८ टक्क्यांनी कपात झाली आहे. सध्या क्रूड ऑइलच्या एक बॅरेलसाठी ९०.७६ डॉलर्स मोजावे लागतात. जून २०१२पासूनचा हा सर्वात नीचांक आहे.
सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीमध्ये कपात करता येणे शक्य नाही. त्यामुळेच मतदान झाल्यानंतर ही कपात लागू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने १७ जानेवारी २०१३ रोजी डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येक महिन्याला ४० ते ५० पैशांची वाढ करण्यास मंजूरी दिली होती.