काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याच्या अटकेच्या निषेधार्थ हुíरयत कॉन्फरसचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांनी शनिवारी काश्मीर खो-यात बंद पुकारला होता.
श्रीनगर- काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याच्या अटकेच्या निषेधार्थ हुर्रियत कॉन्फरसचे प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांनी शनिवारी काश्मीर खो-यात बंद पुकारला होता. त्यामुळे तेथील जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते.
काश्मीर खो-यातील दुकाने, व्यापारी संस्था, पेट्रोल पंप आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर सरकारी कार्यालये आणि बँकांमध्येही शुकशुकाट पाहायला मिळत होता. यावेळी कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून काश्मीर खो-यात पोलिसांनी व निमलष्करी दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आधीच देशविरोधी कारवायांप्रकरणी अटकेत असलेल्या मसरत आलमची काश्मीरमधील सत्तांतरानंतर सुटका करण्यात आली होती. मात्र सुटका होताच त्याने पुन्हा एकदा काश्मीरमधील रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकावत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या.
त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर १६ एप्रिलला त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला असून त्याला सध्या जम्मूमधील तुरुंगात रवाना करण्यात आले आहे. तर त्याने केलेला जामिनाचा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.