बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका शाळेच्या कार्यानुभव शिक्षकांचे संगणक सहाय्य शिक्षण आणि डिजिटल साक्षरता एक जीवन कौशल्य (कॉम्प्युटर अॅडेड लर्निग अँड डिजिटल लिटरसी अॅज लाईफ स्कील) याचे तीन दिवसीय संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षणातील ९० कार्यानुभव शिक्षक पहिली ते आठवीच्या ५५,००० विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणार आहेत. गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर संगणक कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे कार्यानुभव शिक्षकांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान देऊन संगणक प्रशिक्षणाद्वारे भविष्यात विद्यार्थ्यांना संगणक कार्यक्रम उत्तम स्त्रोत म्हणून लाभकारक ठरू शकतो.
संगणक कार्यक्रमातून माहिती तंत्रज्ञान आणि पारंपरिक शिक्षणपद्धती यांचा सुनियोजित मेळ साधून विद्यार्थी स्व-अध्ययनाने शिकतात. कृतीयुक्त, प्रकल्पबद्ध आणि ध्वनीचित्रफितीद्वारे (अॅक्टिव्हिटी, प्रोजेक्ट आणि व्हीडिओ बेस लर्निग) विद्यार्थी मनोरंजन आणि सोप्या पद्धतीने संगणकीय कौशल्ये आत्मसात करतात. संगणक शिक्षणाने विद्यार्थ्यांना योग्य वयात संगणकाची ओळख होत असून, त्याचा सकारात्मक परिणाम शैक्षणिक अभ्यासात होतो.