महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने महिलांच्या डायव्हिंग ३ मीटर स्प्रिंगबोर्ड जलतरण प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
थिरुवनंतपुरम- महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने महिलांच्या डायव्हिंग ३ मीटर स्प्रिंगबोर्ड जलतरण प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. बुधवारी अंतिम फेरीत २१४.५० गुण मिळवत तिने बाजी मारली. याच प्रकारात महाराष्ट्राच्या सिमरनला रौप्यपदक मिळाले.
महाराष्ट्राचा वेटलिफ्टर ख्रिस्तोफर व्हिक्टरने १०५ किलो गटात रौप्यपदक मिळवले. त्याने एकूण ३१४ किलो वजन उचलले. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५९ किलो ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या विक्रम क्रूशंतने कांस्यपदक मिळवले. महिलांच्या टेनिस सांघिक प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कारण उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पराभव झाला.
साजन प्रकाशचे चौथे सुवर्ण
केरळचा जलतरणपटू साजन प्रकाशची स्पर्धेतील सोनेरी कामगिरी चौथ्या दिवशी सुरू राहिली. त्याने बुधवारी त्याचे स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक पटकवले. २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात त्याने २:००.६९ सेकंदासह स्पर्धेतील विक्रम नोंदवला.
जोश्ना आणि सौरवला सुवर्णपदके
जोश्ना चिनाप्पा आणि सौरव घोषाल या स्क्वॉशपटूंनी एकेरीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. जोश्नाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्या आरला ११-५, ११-८, ११-४ नमवले. या प्रकारात महाराष्ट्राच्या उर्वशी जोशीने कांस्यपदक मिळवले. घोषालने हरिंदर पाल सिंग संधूचा चुरशीच्या लढतीत पराभव केला.
विजयला आणखी दोन पदके
लंडन ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमारची पदकांची कमाई सुरूच आहे. मंगळवारी दोन सुवर्णपदके पटकवल्यानंतर विजयने सव्र्हिसेसचे प्रतिनिधित्व करताना बुधवारी २५ मीटर स्टॅँडर्ड पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकवले. मात्र २५ मीटर स्टॅँडर्ड पिस्तूल वैयक्तिक प्रकारात विजयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात गुरप्रीत सिंगने सुवर्णपदक पटकवले.
मोहनलाल यांची ‘ऑफर’ फेटाळली
मोहनलालची पैसे परत करण्याची मागणी केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी फेटाळली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या समारंभात कार्यक्रम सादर केल्याने मोहनलालने १ कोटी ६३ लाख रुपये घेतले होते. मात्र ते परत करणार असल्याचे सुपरस्टार मोहनलालने म्हटले होते. मोहनलालने सादर केलेला ‘लालिसम प्रकार’ फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या मोठय़ा रकमेबद्दल जाहीर टीका होऊ लागली. त्यानंतर मोहनलाल यांनी सदर रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली होती.