ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच रायगड जिल्ह्यातील नागोठणे, कर्जतमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून- ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच रायगड जिल्ह्यातील नागोठणे, कर्जतमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी मोठमोठय़ा रांगा लावल्या होत्या.
ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध शंकर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोळ्याशंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात हा सण साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वाच जुन्या असलेल्या कौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बेलफुले वाहत, शिवलिंगाला दूध अर्पण करून यथासांग पूजा करण्यात आली. कळवा, कोपरी, ढोकाळी येथील शिवमंदिरात भाविकांनी पूजा करून हा सण साजरा केला. अनेक ठिकाणी या सणानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शिवभक्तांनी भंडा-याचेही आयोजन केले होते.
कर्जत तालुक्यातील वैजनाथ, तमनाथ, वाकस, कशेळे, वारे, साळोख, मुद्रे (खुर्द), नेरळ, माथेरान आदी ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या चार दिवसांपासून करण्यात आले होते. सायंकाळी लेझीम, ढोलाच्या व भजनाच्या तालावर श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली.
मुरबाड तालुक्यातील एकूण ९ शिवमंदिरात संपूर्ण तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. शहापूर तालुक्याच्या सीमारेषेवरील मुरबाड तालुक्यातील संगमेश्वर येथील प्राचिन शिवमंदिरात पाच हजारहून जास्त भाविकांनी दर्शन, अभिषेकासाठी गर्दी केली होती. तालुक्यातील संगमेश्वर, िपपळेश्वर, देहरी, म्हसा, सरळगाव येथील भैरवनाथ, मुरबाड तसेच मुरबाड एमआयडीसी भागातील घोडदेश्वर, शिरवली येथील शिवमंदिर, माळ येथील सप्तशृंगी आश्रमातील प्राचिन शिवमंदिर येथे त्या त्या परिसरातील भाविक शिवरात्रीनिमित्ताने अभिषेक व दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केलेली आहे. मुरबाडमधील या सर्व ठिकाणी यात्रेचे स्वरूप आलेले असते. संगमेश्वर, घोडदेश्वर, बांदलपाडा, देहरी, म्हसा, येथे मोठय़ा प्रमाणात यात्रा भरत असते. संगमेश्वर येथील यात्रा मात्र शहापूर व मुरबाड या दोन्ही तालुक्यात प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने येथे पाच हजारहून जास्त भाविकांनी हजेरी लावली आहे.
नागोठणेत कायस्थ प्रभू समाजाच्या श्री जुना रामेश्वर मंदिर व हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ, संचालित पुरातन रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने लघुरुद्र पूजन करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी रामेश्वराचे दर्शन घेतले. सायंकाळी पालखी सोहळ्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
कर्जतमध्ये गावा गावातील श्री शंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील वैजनाथ, तमनाथ, वाकस, कशेळे, वारे, साळोख, मुद्रे (खुर्द), नेरळ, माथेरान आदी ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या चार दिवसांपासून करण्यात आले होते.
अंबरनाथमध्येही शिवभक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी
अंबरनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ५ लाख भाविकांनी शिवमंदिरात दर्शन घेतले. रात्री १२ वाजता ग्रामस्थांचा मानाचा अभिषेक घेण्यात आला. तर या ठिकाणी आयोजित केलेल्या जत्रेस सुमारे ७ लाख भाविक दाखल झाले होते.