वडवली परिसरात राहणा-या स्नेहल उमरोटकर (५२) या महिलेच्या दिवसाढवळय़ा झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ – येथील वडवली परिसरात राहणा-या स्नेहल उमरोटकर (५२) या महिलेच्या दिवसाढवळय़ा झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे.स्नेहल पती आणि मुलासह येथील तारा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.
शुक्रवारी सायंकाळी ८.४०च्या सुमारास स्टेशन परिसरातील गजानन ज्वेलर्समध्ये काम करणारे त्यांचे पती विवेक घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून लावलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा तोडून ते आत गेले असता, पत्नीचा रक्ताच्या थारोळय़ात पडलेला मृतदेह त्यांना दिसला.
त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीच्या उद्देशाने स्नेहल यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्नेहल यांचे हात आणि चेहरा ब्राउन टेपने बांधलेला होता. तसेच त्यांच्या अंगावरील काही दागिनेही गायब होते. स्नेहल यांची चोरटय़ांशी झटापट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. चोरटे तीन ते चार जण असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. झोन-५चे पोलिस उपायुक्त वसंत जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त माणिक बाखरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. शिवाजीनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.