वादग्रस्त ‘मांकडेड’ बाद पद्धतीचे नाव बदला, अशी सूचना विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी मेरिलबॉन क्रिकेट क्लबला (एमसीसी) केली आहे.
नवी दिल्ली- वादग्रस्त ‘मांकडेड’ बाद पद्धतीचे नाव बदला, अशी सूचना विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी मेरिलबॉन क्रिकेट क्लबला (एमसीसी) केली आहे. यामुळे महान क्रिकेटपटू विनू मंकड यांची प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘‘विनू मंकड हे भारताच्या अनेक महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. त्यांचे क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. मंकड यांचे नाव अशाप्रकारे चर्चिले जाणे, योग्य नाही. त्यामुळे त्या बाद पद्धतीचे नाव बदलण्याची गरज आहे. त्या प्रक्रियेत केवळ मंकड यांचा सहभाग नव्हता. गोलंदाज बिल ब्राऊनही होता. हवं असेल तर ‘मांकडेड’ ऐवजी तुम्ही ‘फलंदाज ‘ब्राऊन्ड’ झाला’, असे म्हणू शकता किंवा तसे नामकरण केले जाऊ शकते,’’ असे गावस्कर यांनी आयपीएलच्या दहाव्या हंगामादरम्यान सांगितले.
गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी ‘क्रीज’ सोडून पुढे गेल्यास आणि ‘नॉन-स्ट्रायकर’फलंदाज (तो किंवा ती) बाद होण्याच्या नियमांत बदल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘एमसीसी’ने म्हटले आहे. तोच धागा पकडून सुनील गावस्कर यांनी ‘मांकडेड’ बाद पद्धतीचे नामकरणाची मागणी केली आहे.
‘मांकडेड’ पद्धतीने फलंदाज बाद होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्यात. २०१४मध्ये वनडे सामन्यात श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने इंग्लंडच्या जोस बटलरला ‘मांकडेड’ पद्धतीने बाद केल्यानंतर इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर टीका केली होती.
‘मांकडेड’ बाद पद्धत म्हणजे काय?
१९४७मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यात गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी ‘क्रीज’ सोडून पुढे गेल्याने विनू मांकड दोनदा धावचीत झाले. ब्रिल ब्राऊन त्यावेळी गोलंदाजी करत होते. क्रीज सोडून पुढे जाऊ नको, अन्यथा धावचीत करेन, असे मंकड यांना अनेक वेळा सांगितल्याचे ब्राऊन यांनी म्हटले होते. त्यानंतर अशाप्रकारे बाद होण्याच्या पद्धतीला ‘मांकडेड’ असे नाव पडले. ७० वर्षानंतरही हेच नाव कायम आहे.