‘उफ्.. ये गरमीयां’ म्हणत अनेक तरुणी नाकं मुरडतात. कारण या तळपत्या उन्हात बाहेर पडणं नको वाटतं. त्यामुळे कित्येकदा उन्हाळा सुसह्य कसा होईल याकडे तरुणांचा कल असतो. तुम्हालाही हा उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर या टिप्सचा आवर्जून उपयोग करा.
बाहेर पडताना स्कार्फ घेताय ना? सनग्लासेस आहेत ना सोबत? कॉटनचे कपडे घाला शक्यतो! काय आहेत ना, उन्हाळा लागलाय ना.. मग तरुणी आपल्या नाजूक त्वचेची काळजी घेणारच ना! येणारा प्रत्येक उन्हाळा नकोसाचं असतो. पण यंदा आपण हा उन्हाळाही एन्जॉय करू शकतो.
मे महिन्यात उन्हाचा पारा जास्त वाढतो. मार्च आणि एप्रिल महिना आपण कसाबसा घालवला पण आता मे महिना म्हणजे नकोच बाबा! पण फक्त थोडीशी काळजी आणि काही नियम पाळले तर हा उन्हाळाही आणि पुढच्या येणा-या उन्हाळ्यांचा त्रास आपल्याला अजिबात जाणवणार नाही.
त्वचा निस्तेज होतेय?
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा सुकी पडते; पंरतु उन्हाळ्यात त्वचेवरची चमक नाहीशी होते. त्यामुळे या दिवसांत लाईट बॉडी लोशन लावावे.
स्प्रे ऑन लोशन लावणे केव्हाही उत्तमच. कारण बॉडी लोशनमुळे अंगातून जास्त घाम निघतो. वॉटर हायड्रोजन बॉडी स्प्रे आपल्याला थंडावा देतं. शिवाय ते त्वचेला नरम ठेवण्यासही मदत करतं. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांनी दिवसातून दोनदा क्लिंजरने चेहरा स्वच्छ करावा.
नाक आणि गळ्याच्या येथे असलेल्या मृत चामडयाला जिवंतपणा येण्यासाठी स्क्रबिंग करणंही चांगलंच आहे. आठवडयातून एकदा तरी फेस मास्क करावा. ज्यामुळे चेह-यावरील तेलकटपणा जाण्यास मदत होते.
संत्र्याच्या सुकलेल्या सालाची पावडर आणि बेसन गुलाबपाण्यात मिसळून चेह-याला लावल्यास ब-यापैकी चेहरा स्वच्छ होतो आणि तेलकटपणा दूर होतो. तोंड धुतल्यावर लगेच रुमालाने पुसू नये. चेहरा नितळू द्यावा आणि नतंर हलक्या हाताने सुती कापडाने चेहरा पुसावा.
उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो हलके कपडे परिधान करावेत. त्याचबरोबर सुती कपडे वापरणं केव्हाही उत्तमच. सध्या फ्लोरल कपडयांना जास्त डिमांड आहे. उन्हाळ्याच्या काळात फ्लोरल कपडयांची चलती जास्त असते. आपल्या अंगाखांद्यावर फुलांची नक्षी प्रत्येकीलाच आवडते. आपल्यासोबत फुलं आहेत याचाच आनंद आम्हाला आहे, असं काही तरुणी सांगतात.
तसंच टॉप, कुर्ती, लेगीज अशा प्रत्येक प्रकारात हे फ्लोरल प्रिंटिंग मिळत असल्याने तरुणींचा कल जास्त दिसून येतो. मलमलचे कपडे, सुती कपडे यांवर फ्लोरल प्रिंट खूप खुलून दिसते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत फ्लोरल प्रिंट असलेले कपडे जास्त प्रमाणात दिसून येतात.
त्याचबरोबर या दिवसांत स्कर्टही जास्त प्रमाणात वापरले जातात. प्रोफेशनल स्कर्टपासून ते पार्टी वेअरिंग स्कर्टची चलती असल्याने उन्हाळ्यात या स्कर्टना जास्त डिमांड दिसून येत आहे.
आपल्याकडे साधारण दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडकडीत ऊन असतं. या वेळेत अल्ट्रावॉयलेट किरणं प्रखर असतात. त्यामुळे यावेळेत बाहेर पडताना विचार करावा. समजा या काळात बाहेर पडायचं असेल तर त्वचेला एपीएफ प्रोटेक्शनची क्रीम लावावी. एपीएफ क्रीम सूर्यापासून निघणा-या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात.
कोणत्याही सनस्क्रीनचा प्रभाव केवळ २ तासच राहतो; त्यामुळे बाहेर पडताना आपल्या पर्समध्ये असे सनस्क्रीन स्वत:जवळ बाळगावेत. उन्हामुळे केस कोरडे पडतात.
बाहेर पडताना केसांपासून चेह-यापर्यंत स्कार्फ बांधावा कारण उष्णतेमुळे आपल्या केसांवर वाईट परिणाम होतात. ओठांवर लीप बाम जरूर वापरावा. आजकाल खास लहान मुलांसाठी सनस्क्रीन येतात, त्यामुळे आपण ते घेऊ शकतो.
मे महिना म्हटलं की पार्टी, लग्न, साखरपुडा असे कार्यक्रम होतंच असतात. पण या गर्मीमुळे मेकअप करण्याचा अनेकींचा मूड जातो. पण उन्हाळ्यात शक्यतो हलका मेकअप करावा. क्लिनिंगमुळे चेहरा स्वच्छ होतो. त्यामुळे मेकअप करायच्या आधी क्लिनिंग करून घ्यावं. फाऊंडेशन वापरताना वॉटरप्रूफ फाऊंडेशन वापरावे.
वॉटरप्रूफ फाऊंडेशनही अगदी कमी प्रमाणात वापराणं गरजेचं आहे. आय मेकअपही साधा असावा. मस्करा आवश्यक लावावा. वॉटरप्रूफ लिपस्टिकचा वापर शक्यतो करावा. उन्हाळ्यात डार्क मेकअप शक्यतो टाळावा, त्यामुळे घाम अधिक प्रमाणात येतो.