सॉफ्टवेअरमधील जागतिक कंपनी मायक्रोसॉफ्टने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने गुरुवारी तब्बल १८,००० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूयॉर्क- सॉफ्टवेअरमधील जागतिक कंपनी मायक्रोसॉफ्टने खर्च कमी करण्याच्या दृष्टीने गुरुवारी तब्बल १८,००० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीसाठी ही आतापर्यंतची ऐतिहासिक नोकर कपात ठरली. या कपातीची सर्वाधिक झळ नोकियाच्या कर्मचा-यांना बसली असून काही महिन्यांपूर्वीच मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन झालेल्या नोकियाच्या तब्बल १२,५०० कर्मचा-यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
गेल्याच आठवडय़ात कंपनीने मुख्य कार्यकारी सत्या नडेला यांनी कर्मचा-यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा नोकर कपातीचे संकेत दिले होते. वाढता खर्च कमी करण्याबरोबर उत्पादकता वाढवण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागल्याचे नडेला यांनी म्हटले आहे. पुढच्या वर्षापर्यंत टप्प्याटप्याने कर्मचारी कमी केले जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात १३,००० कर्मचा-यांना कमी केले जाणार असून पुढच्या सहा महिन्यांमध्ये त्यांची यादी तयार केली जाणार आहे. दरम्यान कर्मचारी कपातीची प्रक्रिया ही विचारपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने होईल, अशी ग्वाही नडेला यांनी दिली आहे. दरम्यान भारतात मात्र या कपातीचा फारसा परिणाम होणार नाही.
याआधी २००९ मध्ये कंपनीने ५८०० कर्मचा-यांना कमी केले होते. ३९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्मचा-यांची कपात करण्यात आली. जागतिक बाजारपेठेत इतर कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेमुळे मायक्रोसॉफ्टच्या अडचणी वाढल्या आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. व्यावसायिक वृद्धीसाठी नवीन कल्पना विकसित करणे आवश्यक असल्याचे नडेला यांनी म्हटले आहे. दरम्यान, नोकियाला खरेदी केल्यानंतर कंपनीचे २५,००० कर्मचारी मायक्रोसॉफ्टच्या पे-रोलवर आहेत.
खर्चाला आवर घालण्याबरोबरच उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया विचारपूर्वक आणि पारदर्शकपणे केली जाईल. – सत्या नडेला, मुख्य कार्यकारी, मायक्रोसॉफ्ट
वेतनाचा भार डोईजड
नोकियाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीचे २५,००० कर्मचारी मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. यामुळे मायक्रोसॉफ्टचे मनुष्यबळ तब्बल १,२७,००० पर्यंत वाढले. गुगल आणि अॅपलच्या तुलनेत ही संख्या मोठी असून वेतनावर कोटय़ावधी डॉलर्स खर्च होत आहेत.