गेले वर्षभर मंदीचा सामना करणा-या वाहन उद्योगाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.
नवी दिल्ली– गेले वर्षभर मंदीचा सामना करणा-या वाहन उद्योगाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. उत्पादन शुल्क कपातीने विक्रीला चालना मिळाली असून वाहन कंपन्यांची विक्री वाढली आहे. प्रमुख मोटार उत्पादक मारुती सुझुकीला जूनच्या तिमाहीत ७६२.२८ कोटींचा नफा झाला. यामध्ये २०.७ टक्क्यांची वाढ झाली.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २,९९,८९४ मोटारींची विक्री केली. यामध्ये १२.६ टक्क्यांची वाढ झाली. उत्पादन शुल्क कपात वाढवल्याने मोटारींची मागणी वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विक्रीतून ११,०७३.५१ कोटींचा महसूल मिळाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९,९९५.१२ कोटींचा महसूल मिळाला होता. तर ६३१.६० कोटींचा नफा झाला होता.
स्थानिक उत्पादनावर भर दिल्याने उत्पादनाचा खर्च काही प्रमाणात कमी झाला आहे. तसेच चलन अवमूलन कमी झाले असून रुपया स्थिरावला आहे. ज्यामुळे परकीय चलन विनिमयातून चांगला नफा मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.