देशातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम’ मिरा-भाईंदरमध्ये सुरू होणार आहे.
भाईंदर – देशातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम’ मिरा-भाईंदरमध्ये सुरू होणार आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या इंद्रधनुष्य लसीकरण योजनेअंतर्गत मिरा-भाईंदरमध्ये एक विशेष मोहीम ७ एप्रिल ते ७ जून पर्यंत राबवली जाणार आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन’चे मेडिकल ऑफिसर डॉ. परेश कंथारिया आणि मिरा-भाईंदर महापालिका उपायुक्त (आरोग्य विभाग) डॉ. संभाजी पानपत्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेच्या कालावधीत शहरातील ११७ ठिकाणी लसीकरण केंद्र असतील.
त्यातील अधिकतर झोपडपट्टी, फूटपाथ, सुरू असलेली बांधकामे या ठिकाणी असतील; जेणेकरून याचा लाभ स्थलांतरित बालके घेऊ शकतील. नवजात बालके ते दोन वर्षापर्यंतची बालकांना हेपेटाईटीस बी, मिजल, बीसीजी, ओपीव्ही, डीटीपी, एमएमआर तसेच गर्भवती महिलांना लसीकरण योजनेचा फायदा मिळणार आहे.
मोहिमेच्या कालावधीत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता महापालिकेकडून घेतली जाणार आहे.