कर्णधार वासिम जाफरपाठोपाठ (१४३) मधल्या फळीतील हिकेन शाहच्या (१७०) शतकामुळे रणजी करंडकाच्या ‘ग्रुप ए’मध्ये गतविजेत्या मुंबईने ९ बाद ५०१ धावांवर पहिला डाव घोषित केला.
मुंबई – कर्णधार वासिम जाफरपाठोपाठ (१४३) मधल्या फळीतील हिकेन शाहच्या (१७०) शतकामुळे रणजी करंडकाच्या ‘ग्रुप ए’मध्ये गतविजेत्या मुंबईने ९ बाद ५०१ धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर दुस-या दिवसअखेर रविवारी पाहुण्या ओदिशाच्या तीन विकेट ७९ धावांत मिळवत वर्चस्व कायम राखले.
जाफर आणि शाहमुळे बहरलेल्या फलंदाजीनंतर यजमानांच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासही उंचावला. मध्यमगती जावेद खानचा अप्रतिम स्पेल (६-२-७-२) आणि त्याला लाभलेल्या शार्दूल ठाकूरच्या (१ विकेट) साथीमुळे ओदिशाची अवस्था ३ बाद ३६ अशी झाली. त्यातच बिपलब समंतराय दुखापतग्रस्त होऊन माघारी परतल्याने पाहुणे अधिकच अडचणीत आले.
मात्र सलामीवीर नटराज बेहेराने (खेळत आहे ४५) अभिलाष मलिकसह (खेळत आहे २८) दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना ओदिशाला सावरले. मात्र ४४२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाहुण्यांसमोर फॉलोऑन टाळण्याचे मोठे आव्हान आहे.
तत्पूर्वी, २ बाद २४२ धावांवरून यजमानांनी बहारदार फलंदाजी करताना पाचशेचा आकडा गाठला. नाबाद शतकवीर वासिम जाफरने हिकेनसह तिस-या विकेटसाठीची भागीदारी २२२ धावांपर्यंत वाढवताना मुंबईला तीनशेच्या घरात नेले. जाफरला बाद करत दीपक बेहराने भागीदारी संपुष्टात आणली.
यजमानांच्या कर्णधाराने १३ चौकार आणि तीन षटकारांसह २९० चेंडूंत १४३ धावांची उपयुक्त खेळी केली. जाफर परतल्यानंतर सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेत हिकेन शाहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सवरेत्कृष्ट खेळी साकारतानाच सूर्यकुमार यादवसह चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या.
शाहने पाच तास खेळपट्टीवर उभे राहताना २७५ चेंडूंत २१ चौकार आणि ३ षटकारांसह १७० धावांची बहारदार खेळी केली. त्यानंतर तळातील सिद्धेश लाड (३९) आणि जावेद खाननेही (३६) फलंदाजीचा आनंद लुटताना मुंबईला पाचशेची मजल मारून दिली. ९ बाद ५०१ धावांवर यजमानांनी पहिला डाव घोषित केला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव – ९ बाद ५०१ (डाव घोषित) (शाह १७०, जाफर १४३, मोहंती ७३-३) वि. ओरिसा – पहिला डाव – ३ बाद ७९ (बेहेरा खेळत आहे ४५, खान ७-२).
सेहवागचे हंगामातील पहिले अर्धशतक
नवी दिल्ली : रणजी हंगामात ‘ग्रुप ए’मधील लढतीत विदर्भाविरुद्ध वीरेंदर सेहवागने हंगामातील पहिले अर्धशतक झळकवले. अन्य फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिल्याने दिल्लीला दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद ४४८ धावा करता आल्या. त्यांच्याकडे आता ३६० धावांची मजबूत आघाडी आहे. सेहवागच्या अर्धशतकासह मिथुन मन्हासचे (१००) शतक आणि आशिष नेहराच्या ५७ धावा दिल्लीच्या डावात महत्त्वपूर्ण ठरल्या. सेहवागने ७२ चेंडूंत १० चौकारांसह ५६ धावा फटकवल्या.
मनिष पांडेचे १२वे शतक
हुबळी : मनिष पांडेने (१६१) प्रथमश्रेणी क्रिकेटमधील १२वे शतक साजरे केल्याने कर्नाटकला ‘ग्रुप ए’मध्ये पंजाबविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेता आली. कर्नाटकने दिवसअखेर ७ बाद ३६७ धावा झाल्या केल्या. पजाबचा डाव १७४ धावांत संपला आहे.
महाराष्ट्राला आघाडी
कन्नूर : हर्षद खडिवलेच्या हुकलेल्या शतकाच्या (९७) जोरावर महाराष्ट्राने ‘ग्रुप सी’मध्ये केरळच्या १५१ धावांना उत्तर देताना ३१४ धावा फटकवल्या. ९व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय दरेकरनेही (५२) अर्धशतक साजरे केले.
ऋषी धवनचा भन्नाट फॉर्म कायम
विशाखापट्टनम : मध्यमगती गोलंदाज ऋषी धवनने हंगामात सहाव्यांदा पाच विकेट्स घेतल्याने हिमाचल प्रदेशला ‘ग्रुप सी’मध्ये आंध्र प्रदेशला ४१७ धावांवर रोखता आले. सर्वाधिक विकेट्स (४६) घेणाऱ्यांमध्ये धवनने अव्वल स्थान राखले आहे. हिमाचलची ३ बाद २४ स्थिती आहे.
सनी सिंगचे द्विशतक
अहमदाबाद : हंगामातील निराशाजनक कामगिरी भरून काढत सनी सिंगने (२०१) द्विशतक साजरे केल्याने हरयाणाने ‘ग्रुप ए’मध्ये यजमान गुजरातविरुद्ध पहिला डाव ६ बाद ५७३ धावांवर घोषित केला. दिवसअखेर गुजरातच्या १ बाद २७ धावा झाल्या.
बंगालची उत्तर प्रदेशवर आघाडी
कोलकाता : मध्यमगती गोलंदाज आरपी सिंगच्या (पाच विकेट) प्रभावी मा-यानंतर ‘ग्रुप बी’मध्ये बंगालने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. पाहुण्यांचा कर्णधार आणि लेगस्पिनर पियुष चावला पहिलाच चेंडू टाकल्यावर दुखापतग्रस्त झाल्याने तो गोलंदाजी करू शकला नाही. उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावातील २१२ धावांच्या बदल्यात बंगाल २८४ धावा करू शकला. कर्णधार लक्ष्मी रतन शुक्लाचे शतक (११७) बंगालला तारणारे ठरले. दिवसअखेर दुस-या डावात उत्तर प्रदेशची ३ बाद ५० अशी स्थिती आहे.
बडोद्याला पहिल्या डावात आघाडी
बडोदा : बडोद्याने ‘ग्रुप बी’मध्ये सव्र्हिसेसविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. धिरेन मिस्त्रीच्या (११८) शतकाच्या जोरावर बडोद्याने सव्र्हिसेसच्या १९१ धावांना उत्तर देताना ३६९ धावा फटकवल्या. त्याबदल्यात सव्र्हिसेसच्या १ बाद २ धावा झाल्या आहेत.
हनुमा विहारीचे द्विशतक
पणजी : हनुमा विहारीच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्यावहिल्या द्विशतकाच्या (नाबाद २०१) जोरावर हैदराबादने ‘ग्रुप सी’मध्ये गोवाविरुद्ध पहिला डाव ६ बाद ५१४ धावांवर घोषित केला. हनुमा हा गेल्या वर्षी भारताने जिंकलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप संघाचा सदस्य होता.