अहमदाबादमध्ये होणा-या पुढील लढतीवर पावसाचे सावट असल्याने माजी विजेत्यांचे आव्हान गटवार साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबई- आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचे चँपियन्स लीग टी-२० मध्ये काही खरे नाही. सुरुवातीच्या दोन लढतींनंतर केवळ दोनच गुण त्यांच्या खात्यात आहेत. अहमदाबादमध्ये होणा-या पुढील लढतीवर पावसाचे सावट असल्याने माजी विजेत्यांचे आव्हान गटवार साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे.
राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पात्रता फेरीतून मुख्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या ओटॅगोविरुद्ध मुंबईची विजयाची शक्यता वाटत होती. मात्र सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा) पावसाने हजेरी लावला. मुंबई वि. ओटॅगो लढत सोमवारची दुसरी लढत होती. मात्र पाऊस असा काही पडला की, दोन्ही सामने रद्द करावे लागले. अपयशी सुरुवात आणि त्यानंतर दुस-या लढतीत केवळ दोन गुणांवर समाधान मानावे लागल्याने दोन सामन्यांतून मुंबईच्या नावे केवळ दोनच गुण आहेत.
मुंबईची गटवार साखळीतील तिसरी लढत शुक्रवारी (२७ सप्टेंबर) अहमदाबादमध्येच होणार आहे. या लढतीवर मुंबईचे स्पर्धेतील आव्हान अवलंबून आहे. मात्र या
लढतीवरही पावसाचे सावट आहे. शुक्रवारीही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही लढत रद्द झाल्यास आयपीएल ‘चँपियन्स’वर साखळीतच गारद होण्याची वेळ येऊ शकते. फलंदाजीतील ‘ढिले’पणा मुंबईला सलामीच्या लढतीतील भोवला. आयपीएलमध्येही त्यांची अनेक वेळा अशीच सुरुवात झाली. मात्र चँपियन्स लीगमध्ये गटवार साखळी तसेच केवळ चार सामने खेळायला मिळणार आहेत. सुमार कामगिरीनंतर पावसाने मुंबईला अडचणीत आणले आहे. निकाल काहीही लागो. मात्र तिसरी लढत व्हावी, असे मुंबईच्या चाहत्यांना वाटते. त्यासाठी देव ‘पाण्यात’ ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, इतकीच अपेक्षा!
हवामानाचा विचार का केला गेला नाही?
मुंबईसह ‘ए ग्रूप’मधील हायवेल्ड लायन्स आणि पर्थ स्कॉर्चर्ससह ‘बी’ ग्रूपमधील टायटन्स आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो, ब्रिस्बेन हीट आणि हैदराबाद सनरायझर्सलाही अहमदाबादमध्ये खेळण्याचा फटका बसू शकतो. ३० सप्टेंबरला ‘बी’ ग्रूपमधील टायटन्स वि. टोबॅगो आणि ब्रिस्बेन वि. सनरायझर्स लढतींवरही पावसाचे सावट आहे. २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत अहमदाबादमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. परिणामी स्पर्धेचे वेळापत्रक ठरवताना बीसीसीआयसह आयोजकांनी अहमदाबादच्या हवामानाचा विचार का केला नाही, असा प्रश्न पडतो.