समझोता एक्सप्रेसने पाकिस्तानातून परतलेल्या उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमधील सहा जणांना अटारी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी अटक करण्यात आली.
अटारी – समझोता एक्सप्रेसने पाकिस्तानातून परतलेल्या उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमधील सहा जणांना अटारी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अकरा पिस्तुल जप्त करण्यात आल्या आहेत.
मांस कापण्याच्या यंत्रामध्ये या पिस्तुल लपवून आणल्या जात होत्या. अटारी रेल्वे स्थानकावर सामानाची तपासणी सुरु असताना या सहाजणांकडे हा शस्त्रसाठा सापडला. मांस कापण्याच्या अकरा यंत्रांमध्ये ही अकरा पिस्तुले लपवली होती. चौकशीमध्ये हे सर्वजण उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरचे रहिवाशी असल्याचे समोर आले. या सहाजणांची कसून चौकशी सुरु आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय मुझफ्फरनगरमधील दंगलीची झळ सोसलेल्या तरुणांच्या मागावर असल्याचे विधान केले होते. आयएसआय एजंट दंगलपीडितांच्या संपर्कात असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले होते.