जातीय हिंसाचार उफाळून आलेल्या मुझफ्फरनगरमध्ये तणाव कायम आहे.
मुझफ्फरनगर – जातीय हिंसाचार उफाळून आलेल्या मुझफ्फरनगरमध्ये तणाव कायम आहे. तीन दिवसांपूर्वी येथे झालेल्या जातीय हिंसाचारामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तणावग्रस्त भागात पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या तुकडयांची गस्त सुरु आहे. पुन्हा हिंसा भडकू नये यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत आहोत असे मुझफ्फरनगरचे पोलिस अधीक्षक एच.एम.सिंह यांनी सांगितले.
बुधाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणा-या मोहोम्मदपूरा गावात ३० ऑक्टोंबरला दोन गटात झालेल्या जातीय हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंधरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी बोलवलेल्या महापंचायतीच्या बैठकीत अनेक जाट नेत्यांनी हिंसाचारा प्रकरणी झालेल्या अटकांना विरोध केला होता. स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी दंगल प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार संगीत सोम यांची न्यायालयीन कोठडी १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली. सप्टेंबर महिन्यात मुझफ्फरनगरमध्ये पहिल्यांदा झालेल्या जातीय दंगलीच्यावेळी सोम यांनी इंटरनेटवर बनावट व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमुळे दंगल अधिक भडकली होती.