इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये (ईपीएल) गतविजेता मॅँचेस्टर सिटीला सोमवारी क्रिस्टल पॅलेसकडून १-२ पराभवाचा धक्का बसला.
लंडन – इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये (ईपीएल) गतविजेता मॅँचेस्टर सिटीला सोमवारी क्रिस्टल पॅलेसकडून १-२ पराभवाचा धक्का बसला. याबरोबरच मॅँचेस्टर सिटीच्या जेतेपद राखण्याच्या आशा धोक्यात आल्या आहेत. कारण आता अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीपेक्षा मॅँचेस्टर सिटी ९ गुणांनी पिछाडीवर पडली आहे. त्यातच चेल्सीकडे एक अतिरिक्त लढत आहे.
सिटीचा हा ‘अवे’ लढतींमधील सलग तिसरा पराभव ठरला. इतकेच नाही तर सर्व स्पर्धामधील मिळून सिटीचा हा सात सामन्यांतील पाचवा पराभव ठरला. आता ईपीएलमध्येही त्यांची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ग्लेन मरे (३४वे मिनिट) आणि जेसन पंचेऑन (४८वे मिनिट) यांनी केलेला प्रत्येकी एक गोल क्रिस्टल पॅलेसच्या संस्मरणीय विजयात मोलाचा ठरला.
०-२ पिछाडीनंतर सिटीसाठी गोलचे खाते उघडले ते ७८व्या मिनिटाला याया टुरेने. मात्र तरीदेखील बरोबरी साधणारा गोल करणे मॅँचेस्टर सिटीला जमले नाही. सिटीला आता या पराभवामुळे पुढील हंगामासाठी चॅँपियन्स लीगसाठी पात्र ठरण्यातही अडचणी येऊ शकतात. कारण चेल्सीपाठोपाठ आर्सेनल आणि मॅँचेस्टर युनायटेड यांनी अव्वल तीनमध्ये स्थान भक्कम केले आहे. यास्थितीत सिटीला आता हंगामात आणखी पराभव परवडणारा नाही.
फुटबॉलमध्ये आजच्या लढती
स्पॅनिश ला-लिगा
बार्सिलोना वि. अल्मेरिया – रात्री ११:३०
रायो वॅलेकॅनो वि. रेआल माद्रिद – मध्यरात्री १:३०वा.
(दोन्ही लढतींचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स ४)