जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळाल्याचे फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच भाजपाला हा विजय मिळाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नागपुरात विधानभवनात भाजप आमदारांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांनी जल्लोष केला.
हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसकडे असलेली सत्ता मोठ्या फरकाने खेचून आणली आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात भाजपाने यश मिळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
“विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे.” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.