भारतीय हवामान खात्याने यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, खासगी हवामान कंपनी ‘स्कायमेट’ने यंदाचा मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा आपला दावा कायम ठेवला आहे.
नवी दिल्ली – भारतीय हवामान खात्याने यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, खासगी हवामान कंपनी ‘स्कायमेट’ने यंदाचा मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा आपला दावा कायम ठेवला आहे.
एल-निनोच्या परिणामामुळे भारतीय उपखंडात मान्सून कमी होतो हे मान्य आहे. २००० पासून २००२, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये कमी पाऊस झाला. त्याला एल-निनो कारणीभूत होता. मात्र या ‘एल-निनो’लाही काही अपवाद आहेत. १९५३ ते १९६३ या काळात चार वर्षे एल-निनोचा प्रभाव होता. मात्र त्या चार वर्षात सरासरी चांगला पाऊस झाला, असे उदाहरण स्कायमेटने दिले. त्याचबरोबर पहिल्या वर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावाने पाऊस कमी झाल्यास दुस-या वर्षी त्याची पुनरावृत्ती होत नाही. २०१४ मध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे देशात ८८ टक्के पाऊस झाला. २०१५ हेही एल-निनोचे प्रभाव वर्ष आहे, त्यामुळे त्याचा परिणाम तितकासा जाणवणार नाही, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले.
स्कायमेटने फेब्रुवारीमध्ये यंदा भारतात चांगला मान्सून होणार असल्याचे जाहीर केले होते. दीर्घकालीन सरासरी काळात १०४ ते १०० टक्के पाऊस पडणार आहे. तसेच गेल्या १४० वर्षाच्या इतिहासात दुष्काळामागोमाग दुष्काळ पडण्याचे प्रकार दुर्मीळ आहेत. १९०४-०५, १९६५-६६ आणि १९८५-८६-८७ याच वर्षात लागोपाठ दुष्काळ पडले, असे सिंग म्हणाले.
तसेच हिंदी महासागरातील आणखी एक घटक सकारात्मक आहे. हा प्रवाह हिंदी महासागरातील विषुववृत्तीय प्रदेशात आढळतो. या प्रवाहामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात फरक पडतो. १९९७ मध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव मोठा होता. त्याचवर्षी हिंदी महासागरातील प्रवाह सकारात्मक होता. त्यावर्षी १०२ टक्के पाऊस झाला होता, अशी आठवण सिंग यांनी सांगितली.