त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सहा विकेट्सनी पराभव करत यॉर्कशायरने ‘क्वालिफाइंग -२’ मधून चॅँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
सेंच्युरियन- त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सहा विकेट्सनी पराभव करत यॉर्कशायरने ‘क्वालिफाइंग -२’ मधून चॅँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी रात्री उशीरा झालेल्या लढतीतील यॉर्कशायरच्या या विजयामुळे गुरुवारी झालेली उवा नेक्स्ट विरुद्ध त्रिनिदाद-टोबॅगो यांच्यातील लढत नाममात्र ठरली.
त्रिनिदादने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे आव्हान यॉर्कशायरने सात चेंडू राखून पार केले. चार बाद ५१ या बिकट अवस्थेतून गॅरी बॅलन्स आणि आदिल रशीदने यॉर्कशायरला बाहेर काढले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १० षटकांत नाबाद १०३ धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. बॅलन्सने ३७ चेंडूंत सहा षटकारांसह नाबाद ६४ धावा फटकवल्या. त्याला रशिदची (२७ चेंडूंत नाबाद ३३ धावा) चांगली साथ लाभली.
तत्पूर्वी, त्रिनिदादची सुरुवातही निराशाजनक झाली. रायन साइडबॉटमने त्यांची अवस्था तीन बाद आठ अशी केली. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे पहिले तीन चेंडू खेळल्यावर त्रिनिदादला पुढील १८ चेंडूंवर एकही धाव काढता आली नाही. मात्र डॅरेन ब्राव्हो (४५) आणि कर्णधार दिनेश रामदिनमुळे (५९) त्रिनिदादला १४८ धावांची मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : त्रिनिदाद आणि टोबॅगो – नऊ बाद १४८ (रामदिन ५९, ब्राव्हो ४५, साइडबॉटम १३-३) वि. यॉर्कशायर – १८.५ षटकांत चार बाद १५४ (बॅलन्स नाबाद ६४, रशिद नाबाद ३३),
निकाल : यॉर्कशायर सहा विकेट्सनी विजयी. सामनावीर : गॅरी बॅलन्स.