राजधानी, शताब्दी व दुरांतो या गाड्यांच्या तिकिट दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
नवी दिल्ली- प्रवासी भाड्यात नुकतीच वाढ करण्यात आल्यानंतर रेल्वेतील अव्वल श्रेणीच्या राजधानी, शताब्दी व दुरांतो या गाड्यांच्या तिकिट दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या महिन्यातील ही दुसरी दरवाढ ठरणार आहे. ही दरवाढ १७ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे.
राजधानी, शताब्दी व दुरांतो या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये देण्यात येणारे जेवण महागाल्याने प्रत्येक तिकिटामध्ये २५ ते ३० रुपये इतकी भाडेवाढ करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमध्ये जेवणाची सुविधा पुरवणा-या कंत्राटदारांना दरवाढ देण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या १४ वर्षात या कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारची दरवाढ देण्यात आली नव्हती, असेही या अधिका-याने सांगितले.
सात ऑक्टोबर रोजी रेल्वेने प्रवासी भाड्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ केली होती. या गाडय़ांमधील एसी-२, एसी-३ आणि चेअर कारमध्ये प्रत्येक तिकिटामागे २५ रुपयांची वाढ, तर एसी-१, एक्झिक्युटिव्ह क्लास व दुरांतोमधील स्लीपर क्लासमध्ये तिकिटामागे ३० रुपयांची वाढ होणार आहे.