राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले.
नवी दिल्ली- राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश नारायण सिंह यांचे अभिनंदन केले.
राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून हरिवंश नारायण सिंह यांना, तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेत गुरुवारी यासाठी निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला आवाजी मतदान घेण्यात आले. मात्र, कोणताही निर्णय होऊ न शकल्याने मतदान घेण्यात आले.
रालोआच्या हरिवंश नारायण सिंह यांना १२५ मते मिळाली, तर यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली.
त्यानंतर राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश सिंह हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी अभिनंदन केले.
हरिवंश हे रालोआचे उमेदवार होते. पण आता उपसभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते आता कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. त्यांनी चांगले काम करावे. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत, असे आझाद म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हरिवंश सिंह यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.