मुंबईच्या यशात कर्णधार रोहित शर्मासह किरॉन पोलार्ड आणि जोस बटलर या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या फलंदाजांचा मोठा वाटा असला तरी नवोदित नितीश राणा आणि कृणाल पंडय़ाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयपीएल-१० मधील पहिल्या टप्प्यात मुंबईने सातपैकी सहा सामने जिंकले.
मुंबई इंडियन्सने विक्रमी तिस-यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. त्यात दुस-या फळीचे मोठे योगदान राहिले. आघाडीचा फलंदाज नितीश राणासह अष्टपैलू कृणाल पंडय़ा, मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि लेगस्पिनर करन शर्माने अप्रतिम कामगिरी करून छाप पाडली.
मुंबईच्या यशात कर्णधार रोहित शर्मासह किरॉन पोलार्ड आणि जोस बटलर या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या फलंदाजांचा मोठा वाटा असला तरी नवोदित नितीश राणा आणि कृणाल पंडय़ाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आयपीएल-१० मधील पहिल्या टप्प्यात मुंबईने सातपैकी सहा सामने जिंकले. त्याचे श्रेय नितीश राणाला जाते. तीन विजय त्याने मिळवून दिलेत. सहापैकी दोन वेळा तोच सामनावीर ठरला. अन्य विजयांमध्ये किरॉन पोलार्ड आणि जोस बटलरसह जसप्रीत बुमरा आणि मिचेल मॅकक्लेनॅघनचा मोठा वाटा राहिला. २३ वर्षीय नितीशचा हा पहिलाच आयपीएल हंगाम होता. मात्र दिल्लीकर फलंदाज नवखा वाटला नाही. त्याने कमालीचे सातत्य दाखवले. १३ सामन्यांत ३०.२७च्या सरासरीने ३३३ धावा काढणा-या नितीशने तीन अर्धशतके ठोकलीत. मात्र पहिल्या टप्प्यातील सातत्य राणाला दुस-या टप्प्यात राखता आले नाही. मात्र एकूण कामगिरी पाहता त्याने आयपीएलमध्ये पदार्पणात छाप पाडली.
कृणालने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही स्तरांवर चमकदार कामगिरी केली. १३ सामन्यांत ३४.७१ च्या सरासरीने २४३ धावा काढल्या. तसेच १० विकेटही घेतल्या. केवळ एका प्रथमश्रेणी सामन्याचा अनुभव असलेल्या गुजरातच्या २६ वर्षीय कृणालसाठी पहिलीवहिली आयपीएल संस्मरणीय ठरली. ‘क्वालिफायर २’ आणि अंतिम फेरीत त्याने दिलेले फलंदाजीतील योगदान उल्लेखनीय आहे. त्यानेही राणाप्रमाणे दोनदा ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब मिळवला. अंतिम फेरीतील सामनावीरही तोच ठरला. कृणालचा छोटा भाऊ हार्दिक पंडय़ाने १७ सामन्यांत २५० धावा आणि सहा विकेट घेत मुंबईच्या यशात खारीचा वाटा उचलला.
मुंबई इंडियन्सच्या यशात फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांचा सिंहाचा वाटा आहे. त्यात मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरासह मिचेल मॅकक्लेनॅघन, लेगस्पिनर करन शर्मा आणि वेगवान गोलंदाज लसित मलिंगाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मलिंगा असो किंवा मॅकक्लेनॅघन, दोघांना आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मात्र बुमराने यंदाही चमकदार कामगिरी करत आपली दखल घ्यायला लावली आहे. बुमराने १६ सामन्यांत २० विकेट घेतल्यात. मुंबईतर्फे सर्वाधिक विकेट त्याच्याच आहेत. त्याला लेगस्पिनर करनने ‘क्वालिफायर २’मध्ये कोलकाताविरुद्ध अप्रतिम कामगिरी करताना मुंबईला चौथ्यांदा ‘फायनल’मध्ये पोहोचवण्यास मोलाचा वाटा उचलला.