रामदेव बाबा यांच्या पंताजली योगपीठातील माजी कर्मचा-याचे अपहरण आणि त्याला मारहाण केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी रामदेव बाबा यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हरिद्वार – योग गुरू रामदेव बाबा यांच्या पंताजली योगपीठातील माजी कर्मचा-याचे अपहरण आणि त्याला मारहाण केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी रामदेव बाबा यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, रामदेव बाबा यांचा भाऊ फरारी आहे.
रामदेव पतांजली योगपीठामध्ये कामाला असलेला नितीन त्यागी या आपल्या नातवाचे योग गुरू रामदेव बाबा यांचा लहान भाऊ राम भरतने अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची तक्रार सोमदत्त यांनी कंखाल पोलिस ठाण्यात केली.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यागीची सुटका केली व एका व्यक्तीला अटक केली. मात्र रामदेव बाबा यांचा भाऊ अद्यापही फरारी असल्याचे पोलिस ठाण्याचे सर्कल अधिकारी चंद्रमोहन नेगी यांनी सांगितले.
रामदेव बाब यांनी हा आरोप फेटाळून लावत हा एक प्रकारचा कट असून, आपला भाऊ फरारी नसल्याचे सांगितले. माझ्या दौ-यादरम्यान मी कॉँग्रेस पक्षावर कडाडून टीका केल्याने हा कट रचण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यागी हा पतांजली योगपीठामध्ये वाहनचालक म्हणून काम करत होता. दोन वर्षापूर्वी त्याने २५ लाख किंमतीचे गाडीचे काही भाग आणि महत्त्वाच्या वस्तूंची चोरी केली असल्याचे रामदेव यांचे प्रमुख प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.