योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांना टक्कर देण्यासाठी हरियाणातील दुसरे बाबा व डेरा सच्चा सौदाचे प्रमुख रामरहीम मैदानात उतरले आहेत.
नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांना टक्कर देण्यासाठी हरियाणातील दुसरे बाबा व डेरा सच्चा सौदाचे प्रमुख रामरहीम मैदानात उतरले आहेत. हरियाणासह आणखी काही राज्यांतही त्यांनी स्वदेशी उत्पादनांची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे.
नूडल्सपासून बिस्किटे आणि साबण, तेल, शाम्पूपासून ते आयुर्वेदिक औषधांपर्यंत अनेक दैनंदिन वापरातील वस्तु आपल्या कंपनीमार्फत रामदेव यांनी बाजारात आणल्या आहेत. त्यांना प्रतिसादही जबर मिळत आहे. मेसेंजर ऑफ गॉड म्हणवून घेणारे आणि समर्थकांची मोठी फौज दिमतीला असलेले बाबा रामरहीम एमएसजी ब्रँडसह बाजारपेठेत उतरत असून ते या सर्व वस्तूंबरोबरच फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही विकणार आहेत.
आपल्या निर्णयामागील हेतू स्पष्ट करताना रामरहीम म्हणाले की, हल्ली बाजारात मिळणा-या वस्तूमध्ये भेसळ असते. ग्राहकांना शुद्ध जैविक पदार्थ मिळावेत, हा आपला हेतू आहे. प्रत्येक वस्तूची प्रयोगशाळेत चाचणी झाल्यानंतरच तो बाजारात दाखल केला जाईल. बाबा रामरहीम हेच स्वत: कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर असून जाहिराती प्रकाशनासाठी तयार आहेत. कोणत्या कंपनीला मागे टाकण्यासाठी आम्ही स्पर्धेत उतरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.