जाणून घ्या क्रिकेट जगतातील हटके घडामोडी…
१८८४
‘विस्डेन’ या जगप्रसिद्ध क्रिकेट मासिकाचे संपादक जॉन विस्डेन यांचे निधन. ‘विस्डेन क्रिकेट अल्मानाक’ हा आजही क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ संदर्भग्रंथ मानला जातो.
१८९०
दक्षिण आफ्रिकेतील डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा करी कपला या दिवशी सुरुवात झाली. पहिला सामना किंबर्ली आणि ट्रान्सवाल या दोन संघांमध्ये झाला.
१९३८
विख्यात क्षेत्ररक्षक कॉलिन ब्लँड यांचा जन्म. ते चांगले फलंदाजही होते आणि ४९ची सरासरी त्यांनी दिली. पण गाजले एक क्षेत्ररक्षक म्हणून. कव्हर्समध्ये उभे राहायचे, तेव्हा अघोषित संचारबंदीच असायची. ते चपळ होतेच, दोन्हीकडे झटकन वळू शकायचे. पण त्यांच्याविषयी दहशत वाढवणारी बाब म्हणजे अत्यंत अचूक थ्रो. लॉर्ड्स कसोटीत १९६५मध्ये त्यांनी केन बॅरिंग्टन आणि जिम पार्क्स यांना धावचीत केले, त्या प्रसंगाची आठवण आजही केली जाते. १९६१-६२मध्ये त्यांनी न्यूझीलंडचे फलंदाज जॉन रीड यांचा १९६१-६२मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत अफलातून झेल घेतला. त्यावेळी ब्लँड यांचे कौतुक करण्यासाठी रीड काही क्षण खेळपट्टीवर थांबले होते!
१९५३
नामवंत क्रिकेट प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांचा जन्म. क्रिकेट कोचिंगला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. ते स्वत: एक सामान्य क्रिकेटपटू होते. पण सामान्य खेळाडूच ब-याचदा असामान्य प्रशिक्षक बनतात, याची प्रचीती बुकॅनन यांनी दिली. त्यांनी क्वीन्सलँड संघाला ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक अजिंक्यपद मिळवण्यात मदत केली. मग इंग्लिश कौंटी मिडलसेक्सलाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. मग ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकपदाची धुरा त्यांच्याकडे आली. ऑस्ट्रेलियाच्या सलग १५ विजयांमध्ये त्यांचा वाटा मोलाचा होता. त्यांच्याच कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाने २००३, २००७मधील वर्ल्डकपही जिंकले.
१९७४
इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर संस्मरणीय विजय. २२६ धावांचे माफक आव्हान इंग्लंडला राखायचे होते. टोनी ग्रेग हे एरवी मध्यमगती गोलंदाज. पण त्यांनी या दिवशी चक्क ऑफस्पिन गोलंदाजी केली आणि ७० धावांमध्ये पाच विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू सर गारफील्ड सोबर्स आणि विख्यात फलंदाज रोहन कन्हाय यांच्या झळाळत्या कसोटी कारकीर्दीचा हा शेवटचा दिवस होता.
१९९१
स्टीव्ह आणि मार्क हे वॉ जुळे त्रिनिदाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी उतरले, त्यावेळी कसोटी इतिहासात एकाच सामन्यात खेळणारे ते पहिले जुळे ठरले.