गतविजेता रेआल माद्रिदने ‘डर्बी’मध्ये अॅथ्लेटिको माद्रिदवर २-१ असा विजय मिळवला. अॅँजेल डी मारियाने ६३व्या मिनिटाला फ्री-कीकवर केलेला गोल माद्रिदच्या विजयात मोलाचा ठरला.
माद्रिद – गतविजेता रेआल माद्रिदने ‘डर्बी’मध्ये अॅथ्लेटिको माद्रिदवर २-१ असा विजय मिळवला. अॅँजेल डी मारियाने ६३व्या मिनिटाला फ्री-कीकवर केलेला गोल माद्रिदच्या विजयात मोलाचा ठरला. या विजयामुळे रेआल माद्रिदला बार्सिलोनाविरुद्धची पिछाडी ११ गुणांनी कमी करता आली असली तरी त्यांच्या यंदा जेतेपद राखण्याच्या आशा जवळपास हुकल्या आहेत.
आपल्या जवळच्या शेजा-यांवर अॅथ्लेटिकोला तब्बल १४ वर्षात विजय मिळवता आलेला नाही. त्यांचीदेखील ही प्रतिक्षा येथील पराभवाने कायम राहिली. ‘स्टार’ ख्रिस्तियानो रोनाल्डोचा दुखापतीमुळे रेआल माद्रिद संघात समावेश नव्हता, मात्र तरीदेखील त्यांना विजय नोंदवता आला. अॅथ्लेटिकोकडून ‘स्टार’ रॅडॅमेल फाल्काओने चौथ्याच मिनिटाला आघाडी देणारा गोल केला होता. मात्र १३व्या मिनिटाला जुआनफ्रानचा स्वयंगोल माद्रिदला १-१ बरोबरी साधून देण्यात महत्त्वाचा ठरला.
बार्सिलोनाचे जेतेपद लांबले
‘स्टार’ लिओनेल मेसीच्या गोलनंतरही बार्सिलोनाला शनिवारी स्पॅनिश ला-लिगामध्ये अॅथ्लेटिक बिल्बाओने २-२ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची बार्सिलोनाची प्रतिक्षा आणखी आठवडाभराने लांबली. आता पुढील आठवडय़ात रविवारी रेआल बेटिसवर विजय नोंदवून जेतेपद नक्की करण्याची संधी बार्सिलोनाला आहे.
अॅथ्लेटिककडून ९०व्या मिनिटाला आंदेर हरेराने गोल केल्याने बार्सिलोनाचा विजय टळला. तत्पूर्वी, अॅथ्लेटिककडून २७व्या मिनिटाला सुसाएटाने गोल करत आघाडी घेतली होती. त्यावर मेसीने ६७व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केला. विशेष म्हणजे ५९व्या मिनिटाला बदली म्हणून आलेला मेसीने लगेचच गोल नोंदवला. या हंगामातील या स्पर्धेतला मेसीचा हा ४४वा गोल ठरला. तसेच ‘अवे’ लढतींमधील त्याचा हा २४वा विक्रमी गोल आहे. यापूर्वी गेल्या हंगामात रोनाल्डोने २३ ‘अवे’ गोल केले होते. दोनच मिनिटांनी अॅलेक्सिस सॅँचेझने बार्सिलोनाला महत्त्वपूर्ण आघाडी देणारा गोल केला. मात्र हरेराच्या गोलने बार्सिलोनाला विजयापासून रोखले.