पायाभूत सुविधा क्षेत्रात अधिक खासगी कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी उतरावे
नवी दिल्ली – पायाभूत सुविधा क्षेत्रात अधिक खासगी कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी उतरावे. यासाठी लहान विमानतळांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी खासगी कंपन्यांना देण्याचा विचार सरकार करत आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी सांगितले. तसेच रेल्वेच्या ४०० स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी लवकरच निविदा मागवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
काही मध्यम आकाराच्या व लहान विमानतळांच्या व्यवस्थापनात खासगी कंपन्यांच्या सहभागास परवानगी देण्याचा प्रस्ताव त्यांची व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे, असे जेटली म्हणाले.
भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी स्थापन केला असून अनेक सार्वभौम व पेन्शन फंड्सच्या संपर्कात आहे.
रेल्वेने रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारला आहे, असे सांगून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक अधिकाधिक करण्याचाही हेतू आहे. लवकरच रेल्वे ४०० स्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या निविदा घेऊन येईल, असे जेटली यांनी सांगितले.