रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे विकास निधी स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक बँक ही प्राथमिक गुंतवणूकदार असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिली
वॉशिंग्टन – रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे विकास निधी स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक बँक ही प्राथमिक गुंतवणूकदार असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिली.
रेल्वे विकास निधी स्थापन करण्याबाबत आम्ही जागतिक बँकेबरोबर काम करण्याचे ठरवले आहे. अगोदरच त्याची सुरुवात झाली होती. परंतु आता ते काम पुढे न्यायचे आहे, असे प्रभू म्हणाले. जागतिक बँक अधिका-यांशी चर्चा केल्यावर ते बोलत होते. इतर सहगुंतवणूकदारांबरोबरच जागतिक बँक ही प्राथमिक गुंतवणूकदार असेल. जागतिक बँकेच्या नेतृत्वावर एकमत झाल्यावर निधी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रभू म्हणाले.
जागतिक बँक नेमका किती निधी देणार, याबाबत प्रभू यांनी माहिती दिली नाही. मात्र भारतीय रेल्वेला जागतिक बँकेतर्फे आतापर्यंतची ही सर्वात मोठी रक्कम असेल, असा दावा त्यांनी केला. परिवहनासंबंधी जागतिक बँकेच्या बैठकीसाठी प्रभू येथे आले आहेत. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाच्या अधिका-यांशीही प्रभू यांनी चर्चा केली. आयएफसी बिगर रेल्वे उपक्रमातून उत्पन्न वाढवण्याची शक्यता तपासून पाहणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
जगभरात रेल्वेला बिगर रेल्वे उपक्रमांद्वारे ३० ते ४० टक्के उत्पन्न मिळते. भारतात हे प्रमाण २ टक्केही नाही. त्यामुळे रेल्वेला सातव्या वेतन आयोगाचा बोजा सहन करावा लागणार असल्याने सध्या हे मोठे आव्हान आहे, असे प्रभू यांनी सांगितले. अमेरिकन परिवहन सचिव अँथनी रेनार्ड फॉक्स यांच्याशीही प्रभू यांनी चर्चा केली.