मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी याला जामीन मंजूर होणे धक्कादायक आहे.
नवी दिल्ली – मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी याला जामीन मंजूर होणे धक्कादायक असून, मानवतेवर विश्वास ठेवणा-या सर्वांसाठी हा एक झटका आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी लोकसभेमध्ये लख्वीला जामीन मंजूर होण्याचा निषेध केला.
लख्वीला जामीन मंजूर झाल्याबद्दल लोकसभेमध्ये सर्व पक्षांनी निषेधाचा ठराव मांडला होता. त्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लख्वीला जामीन मंजूर झाल्याबद्दल भारताने आपली चिंता, देशवासियांच्या भावना पाकिस्तानला कळवल्या आहेत. पाकिस्तानला कठोर संदेशही पाठवला आहे असे मोदी म्हणाले.
पेशावरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याचे पाकिस्तान इतकेच भारतालाही दुख आहे. पेशावरमधल्या घटनेनंतर प्रत्येक भारतीयाच्या डोळयात अश्रू तरळले होते असे मोदी म्हणाले.