लाचखोरीच्या प्रकरणात अटक झालेला केडीएमसीचा लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे याच्या संपत्तीची सर्वत्र चर्चा रंगली असताना त्याचा काहीएक थांगपत्ता लागलेला नाही.
कल्याण – लाचखोरीच्या प्रकरणात अटक झालेला केडीएमसीचा लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे याच्या संपत्तीची सर्वत्र चर्चा रंगली असताना त्याचा काहीएक थांगपत्ता लागलेला नाही.लाचखोरीत अडकलेल्या सर्वच अधिका-यांच्या संपत्तीचे घबाड बाहेर पडले असले तरी बोराडेची नेमकी संपत्ती किती याविषयी माहिती उघड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बोराडेच्या संपत्तीचे गौडबंगाल काय, अशीच चर्चा आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रभाग क्षेत्र अधिकारी बोराडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. लाचखोर अभियंता सुनील जोशीनंतर बोराडे हाच महापालिकेतील बिग बॉस म्हणून ओळखला जात होता.
फेरीवाला, अनधिकृत बांधकाम आणि कत्तलखान्यातून मिळणा-या हप्तेखोरीतून बोराडेची दिवसाची कमाई एक लाखाच्या घरात असल्याची चर्चा पालिकेत आहे. बोराडेंच्या संपत्तीचा छडा लावण्यात अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बोराडेंच्या संपत्तीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली होती.
या संदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते. मात्र त्याचे काहीएक उत्तर आमदारांना देण्यात आलेले नाही. राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आमदार गायकवाड हे सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. बाराडेला सेवेतून निलंबित केले असले तरी पुन्हा महापालिकेच्या सेवेत येण्यासाठी बोराडेची धडपड सुरू झाली आहे.