बुडापेस्टमध्ये (हंगेरी) झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतून भारताच्या पुरुष फ्रीस्टाइल संघाला प्रथमच वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळेल, हे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादवने ‘प्रहार’ला दिली.
मुंबई- बुडापेस्टमध्ये (हंगेरी) झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतून भारताच्या पुरुष फ्रीस्टाइल संघाला प्रथमच वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळेल, हे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादवने ‘प्रहार’ला दिली. जागतिक स्पर्धेत नरसिंग बुधवारी (१८ सप्टेंबर) ७४ किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाला असला तरी वर्ल्डकपमध्ये भारताला प्रवेश मिळवून देण्यात त्याचेही योगदान मोलाचे ठरले आहे.
कुस्ती वर्ल्डकप पुढील वर्षी होणार असून त्यात भारताचा फ्रीस्टाइल पुरुषांचा संघ सहभागी होण्याची पहिलीच वेळ असणार आहे. ‘‘आमचा फ्रीस्टाइल संघ पाहता यंदा जागतिक स्पर्धेतून वर्ल्डकपसाठी पात्र ठरू, हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे अमित कुमार (रौप्यपदक) आणि बजरंगने (कांस्यपदक) भारताला मिळवून दिलेली पदके ही वल्र्डकप प्रवेशासाठी मोलाची ठरली. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या सिनियर कुस्तीपटूंच्या अनुपस्थितीत या दोघांनी चांगली कामगिरी करून दाखवली. जागतिक स्पर्धेत इराण, रशिया, जॉर्जिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्या पाठोपाठ मिळवलेले सहावे स्थान आम्हाला उपयुक्त ठरले. आता वर्ल्डकपमध्ये या अव्वल संघांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. २०२० ऑलिंपिकमध्ये नुकतेच कुस्तीने आपले स्थान कायम राखले. पाठोपाठ आमचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश या सर्व बाबी भारतात कुस्तीचा प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याची ग्वाही देतात,’’ असे मुंबईकर नरसिंगने सांगितले.
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक हुकल्याबद्दल मात्र नरसिंगने नाराजी व्यक्त केली. ‘‘रिपचेज राउंडमुळे मला कांस्यपदकासाठीची लढत खेळण्याची संधी मिळाली होती. कांस्यपदकाची लढत खेळेपर्यंत माझा खेळ चांगला होत होता. मात्र ऐनवेळी गमावलेल्या गुणामुळे माझे पदक हुकले. त्या चुकांतून बोध घेऊन पुढील स्पर्धामध्ये कामगिरी उंचावेन,’’ असे २४ वर्षीय नरसिंगने सांगितले.
पुढील वर्षी ग्लास्गोत होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक राखण्याचे ध्येय नरसिंगने बाळगले आहे. ‘‘पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशिया स्पर्धा माझ्यासाठी मोलाची आहे. त्यात पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यापाठोपाठ २०१६ रियो ऑलिंपिकवरही मी लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने आतापासूनच तंदुरुस्तीवर भर देत असून खेळातील चुका टाळण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे. माझे प्रशिक्षक जगमाल सिंग आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक विनोद कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभत आहे,’’ असे नरसिंगने सांगितले.
राज्यात कुस्तीला व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे जागतिक कुस्ती स्तरावर महाराष्ट्रातून सध्या नरसिंगचेच नाव सातत्याने दिसते त्याबाबत त्याला विचारले असता, ‘‘अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात कुस्तीला व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कुस्तीआखाडयात खेळली जाते. आजही ही परंपरा कायम आहे.
मात्र त्या बरोबरच व्यावसायिक कुस्तीपटू कसे घडतील. यावर विचार होणे आवश्यक आहे,’’ असे नरसिंगने म्हटले.