केवळ ८ मार्च रोजी ‘महिला दिन’ साजरा न करता तो वर्षाचे ३६५ दिवस साजरा करायला हवा. ‘महिला दिना’च्या दिवशी महिलांना जी वागणूक मिळते, जो सन्मान मिळतो तो वर्षभर त्यांना मिळायला हवा, असे मत ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केले.
पोलीस क्षेत्रात येण्याची जिद्द, स्वप्न उराशी बाळगणा-या तरुणींसाठी डॉ. रश्मी करंदीकर एक आदर्श बनल्या आहेत. समाजात अशा काही घटना घडतात, ज्यावरून महिलांच्या सुरक्षेचा, सन्मानाचा प्रश्न निर्माण होतो. महिलेला आपण देवीचे रूप मानतो, नवरात्रीत देवीची पूजा करतो, मात्र दुसरीकडे घरात, रस्त्यावर महिलेवर हात उगारल्याच्या, अत्याचार केल्याच्या घटना घडताना दिसतात. हे थांबायला हवे. यासाठी महिलांनी स्वत: खंबीर बनायला हवे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीरित्या कार्यरत आहेत. घर-नोकरी सांभाळताना या धावपळीत महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हे लक्षात घेता डॉ. रश्मी करंदीकर यांनी महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. महिला पोलीस अधिकारी दिवसभर ताणतणावात कामात असतात. मासिक पाळीदरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी डॉ. रश्मी करंदीकर यांनी ठाणे पोलीस मुख्यालयात आणि वाहतूक नियंत्रण शाखेत ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन’ बसवून घेतले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून महिला पोलिसांनी त्याचे स्वागत केले आहे.
दुसरे म्हणजे आरोग्याची नियमित तपासणी व्हावी आणि ‘स्तन कर्करोग’सारखे रोग टळावेत यासाठी डॉ. रश्मी करंदीकर यांनी कॅम्प भरवले आहेत. महिला पोलीस अधिकारी आणि पुरुष पोलीस अधिका-यांच्या कुटुंबातील महिलांसाठी हे कॅम्प भरवण्यात आले असून एका कॅम्पमध्ये काही महिलांना प्राथमिक स्तरावरील स्तन कर्करोग असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना तात्काळ उपचार पुरवला गेला. आजची स्त्री ही घर सांभाळून नोकरी-व्यवसाय तितक्याच सक्षमतेने हाताळू शकते, असा सकारात्मक संदेश पोलीस वर्दीतील डॉ. रश्मी करंदीकर यांनी समाजामध्ये पोहोचवला आहे.