पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांच्या कलाकृतींचे ‘‘हेरिटेज ऑफ इंडियन कल्चर’’
आदिमानवापासून ते उपलब्ध पुरावे असलेल्या रामायण महाभारतापर्यंत तसेच इ.स.पूर्व ३००० वर्षांपासूनच्या सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा जपत आलेली आपली प्राचीन सिंधु संस्कृती. भौगोलिक दृष्टय़ा ही वैविध्यपूर्ण असा भारत देश तसेच सर्व धर्माच्या संस्कृती आजही जपतो आहे. त्यात आदिमानवाच्या भित्ती-चित्रांपासून ते अद्यावत मंदिर स्थापत्यकलेपर्यंतची कला आजही भारतात नांदते आहे.
प्राचीन संस्कृती जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून ओरिसापर्यंत प्रवास करून भास्कर सगर यांनी त्या त्या ठिकाणी भेटी देऊन विविध स्थळांची रेखाटने केलेली असून, आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेला हा वारसा त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. असा या भारतातील वैविध्यपूर्ण स्थळांचे मनाला प्रसन्न करणा-या, ‘वारसा-भारतीय संस्कृतीचा!’ या चित्रमालिकेतील निसर्गचित्रणाच्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील भाजे-अजिंठा-वेरूळ-कान्हेरी, कार्ला लेणी, नाणेघाट, माकंर्डा मंदिर, प्रतापगड, रायगड, पंढरपूर घाट, गुजरातमधील सोमनाथ मंदिर, पंजाब येथील सुवर्णमंदिर, काश्मीर येथील हिमालय पर्वत रांग, लेह-लडाख येथील पॅलेस, दिल्ली येथील लाल किल्ला, हिमाचल प्रदेशातील हिडिंबा मंदिर, उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री, ताजमहाल, बनारस घाट, सारनाथ स्तूप, बिहारमधील बाराबर लेणी, राजस्थान येथील कीर्तिस्तंभ, मध्य प्रदेशातील खजुराहो, भीमबेटका, सांची स्तूप, उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर, ओरिसा मधील कोणार्क मंदिर, कर्नाटकातील हंपी, म्हैसूर, बदामी, श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वर, आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिर, गोवळकोंडा किल्ला, तामिलनाडूमधील महाबलिपुरम, तिरुचिरापल्लीचा किल्ला, कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक, अंदमान येथील सेल्यूलर जेल, इ. प्रेक्षणीय वारसास्थळांच्या कलाकृतींचा यात समावेश आहे.
या प्रदर्शनात एकूण ४५ कलाकृती मांडण्यात येणार आहेत. हे ‘प्राचीन वारसा’ या चित्रमालिकेतील चौथे तर एकुणात ३७ वे चित्रप्रदर्शन असून आतापर्यंत मुंबई, पुणे, लातूर इ. ठिकाणी प्रदर्शने झालेली असून अमेरिका, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व सिंगापूर देशातील रसिकांनी कलाकृती संग्रही ठेवल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य खुलं राहील.
>> दिनांक १० ते १६ एप्रिल
>> वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७
>> स्थळ : जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट