स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जेतेपदाचा दावेदार म्हणून ज्या संघाची गणना केली जात होती, त्या पोर्तुगालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्ठात आले.
ब्राझिलिया- स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जेतेपदाचा दावेदार म्हणून ज्या संघाची गणना केली जात होती, त्या पोर्तुगालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्ठात आले. ‘ग्रुप जी’मध्ये गुरुवारी घानाविरुद्ध झालेल्या सामन्यात पोर्तुगालने २-१ असा विजय मिळवला. मात्र बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना हा विजय पुरेसा ठरला नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या स्टार खेळाडू असतानाही पोर्तुगालला मोठा विजय मिळवून देऊ शकली नाही.
सामन्यात पहिल्या सत्राच्या ३१व्या मिनिटाला घानाच्या जॉन बॉऐ याच्या पायाला लागून चेंडू त्यांच्याच गोल पोस्ट मध्ये गेला. घानाच्या या स्वयंगोलमुळे पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळाली. पहिल्या सत्रात १-०ने पिछाडीवर असलेल्या घानाकडून दुस-या सत्रातील ५७व्या मिनिटाला आसामोह ग्यानने गोल करत १-१ अशी बरोबरी साधून दिली. दुस-या फेरीत पोहचण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोने ८०व्या मिनिटाला गोल करुन २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर घानाने बरोबरी साधन्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अर्थात या विजयानंतरही पोर्तुगालला काहीच फायदा झाला नाही. स्पेन, इटली या जेतेपदाचे दावेदार समजल्या जाणा-या संघाबरोबर त्यांचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
स्पर्धेपुर्वी ‘ग्रुप जी’मधून जर्मनी आणि पोर्तुगाल दुस-या फेरीत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात जर्मनी आणि अमेरिका यांनी दुस-या फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालचे तीन सामन्यातून एक विजय, एक पराभव आणि एक अनिर्णितमुळे चार गुण झाले. तीच स्थिती अमेरिकेची त्यांनी घानाचा पराभव केला. तर पोर्तुगाल विरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. त्यामुळे त्यांचेही चार गुण झाले. मात्र गोल फरकाचा विचार केल्याच अमेरिकेने विरुद्ध संघावर चार गोल केले. तर विरुद्ध संघाने अमेरिकेवर चार गोल केले. त्यामुळे गोल फरक शून्य राहिला. या बाबतीत पोर्तुगालचा गोल फरक -३ असा राहिला. या गोल फरकामुळेच अमेरिकेला दुस-या फेरीचे तिकिट मिळाले.