जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून फोर्टसि असोसिएट एस. एल. रहेजा रुग्णालयाने मुंबईतील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महिनाभर घेतलेल्या बेसिक लाइफ सपोर्ट प्रशिक्षणाची सांगता केली. या उपक्रमाचा पहिला टप्पा सेंट झेविअर्स महाविद्यालयात झाला होता आणि त्यात ४०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात दादरच्या शारदाश्रम विद्यालय आणि अँटिनिओ डिसिल्व्हा माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
स्मॉल चेंजेस कॅन मेक अ पॉवरफुल डिफरन्स अर्थात छोटे बदल मोठा फरक घडवून आणू शकतात या जागतिक हृदय दिवसाच्या विषयावर आधारित घोषवाक्य स्पर्धाही शाळांच्या आवारात घेण्यात आली. प्रत्येक व्यक्ती, मग ती कोणत्याही वयोगटातील असो, फरक घडवून आणू शकते, यावर यात भर देण्यात आला.
दादर येथील शारदाश्रम विद्यालय आणि अँटिनिओ डिसिल्व्हा माध्यमिक शाळेत २१ ते २७ सप्टेंबर, २०१७ दरम्यान बेसिक लाइफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आठवी, नववी आणि दहावी इयत्तेतील सुमारे ४००० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या उपक्रमाबद्दल फोर्टसि असोसिएट एस. एल. रहेजा रुग्णालयाचे विभागीय संचालक डॉ. बिपिन चेवले म्हणाले, बेसिक लाइफ सपोर्ट पुरवण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या शिकवण्यात आम्हाला या उपक्रमाची मदत झाली. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात त्यांना हे प्रशिक्षण नक्कीच उपयुक्त ठरेल.
अँटिनिओ डिसिल्व्हा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुसान गोम्स म्हणाल्या, बीएलएसवरील सत्रामुळे आमचे विद्यार्थी नक्कीच प्रभावित झाले आहेत. या उपक्रमात चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याचा आम्हाला अभिमान आहे.
वैद्यकीयदृष्टय़ा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मूलभूत प्रशिक्षण त्यांना दिल्याबद्दल आम्ही वैद्यकीय कर्मचा-यांना धन्यवाद देतो, तसेच त्यांच्या कामाचे कौतुक करतो. मुलांना यातून बरेच वैद्यकीय ज्ञान मिळाले आहे, ज्याचा उपयोग ते गरज भासल्यास करू शकतात.