भारताला स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी अमेरिकेने सहकार्याचा हात दिला आहे. दोन्ही देशांनी विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी कार्यगट स्थापन केला आहे.
नवी दिल्ली- भारताला स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी अमेरिकेने सहकार्याचा हात दिला आहे. दोन्ही देशांनी विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी कार्यगट स्थापन केला आहे. या सहकार्याअंतर्गत ६५ हजार टन वजनाच्या विमानवाहू युद्धनौकेचे डिझाईन व तंत्रज्ञान भारताला मिळणार आहे.
भारतातर्फे व्हाईस अॅडमिरल आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एसपीएस चिमा यांच्यासह नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी अमेरिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी विमानवाहू युद्धनौका पीसीयू गेराल्ड फोर्डच्या बांधणीचे काम पाहिले. ही विमानवाहू युद्धनौका व्हर्जिनिया येथील न्यूपोर्ट न्यूज शिपबिल्डिंग येथे बनवण्यात येत आहे.
ही विमानवाहू युद्धनौका जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या युद्धनौकेत भारताला विशेष रस आहे. या वेळी अमेरिकन नौदलाने विमानवाहू युद्धनौकेचे व्यवस्थापन, संशोधन आणि विकास कार्यक्रमाची भारतीय नौदलाला माहिती दिली.
या दौ-यात भारताच्या नौदल अधिका-यांनी पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली.
भारत-अमरिकेने नेमलेल्या कार्यगटात विमानवाहू युद्धनौकेच्या विकासाबाबतचे विविध पैलू, डिझाईन, संरचना, चाचणी, मूल्यांकन, व्यवस्थापन, उभारणी, बांधणी यावर चर्चा केली.