तिसरी सीडेड पेट्रा क्विटोवापाठोपाठ रविवारी पाचवी सीडेड रशियाच्या मारिया शारापोवाचे अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. १०वी मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझनियाकीने शारापोवावर ६-४, २-६, ६-२ मात केली.
न्यूयॉर्क – तिसरी सीडेड पेट्रा क्विटोवापाठोपाठ रविवारी पाचवी सीडेड रशियाच्या मारिया शारापोवाचे अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. १०वी मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझनियाकीने शारापोवावर ६-४, २-६, ६-२ मात केली.
दुसरा सेट जिंकूनही शारापोवाला तग धरता आला नाही. याबरोबरच २००६ नंतर अमेरिकन ओपन जिंकण्याचे शारापोवाचे स्वप्न भंगले. याआधी विम्बल्डन ग्रॅँडस्लॅममध्येही शारापोवाला चौथ्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता.
पुरुष एकेरीत चौथा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररलाही तिस-याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. २६वा मानांकित फ्रान्सच्या जाइल्स सिमॉनने फेररला ६-३, ३-६, ६-१, ६-३ नमवले. याउलट दुसरा मानांकित स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सचा ४-६, ६-१, ६-१, ६-१ पराभव करत चौथी फेरी गाठली. पहिला सेट गमावल्यानंतर फेडररने वेळीच स्वत:ला सावरले.
सहावा मानांकित चेक रिपब्लिकच्या टोमास बर्डिचनेही चौथी फेरी गाठताना रशियाच्या तेमूराझ गॅबश्विलीवर ६-३, ६-२, ६-४ मात केली. याबरोबरच बर्डिचने चौथ्या फेरीत प्रवेश केला. सातवा मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवनेही चौथी फेरी गाठताना बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा ०-६, ६-३, ६-४, ६-१ पराभव केला.
नववी मानांकित सर्बियाच्या येलेना यान्कोविचला चौथ्या फेरीत स्वित्झर्लंडलडच्या बेलिंडा बेनकिककडून ६-७, ३-६ पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीत १२वा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केचाही २०वा मानांकित त्याचाच देशबंधू गेल मॉनफिल्सकडून ४-६, २-६, २-६ पराभव झाला.
बोपण्णाचा विजय
भारताच्या रोहन बोपण्णाने मिश्र दुहेरीत स्लोव्हाकियाच्या कॅतरिना स्रेबोटनिकच्यासाथीने खेळताना दुस-या फेरीत विजय मिळवला. या सहाव्या सीडेड जोडीने स्पेनची अॅनाबेल गॅरिग्यूझ आणि अमेरिकेचा रॅवेन क्लासेन जोडीचा ६-३, ६-४ पराभव केला.