विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्यापासून फॉर्मसाठी चाचपडणा-या ख्रिस गेलला अखेर मंगळवारी झिम्बाब्वे विरुध्दच्या तिस-या सामन्यात सूर सापडला.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्यापासून फॉर्मसाठी चाचपडणा-या ख्रिस गेलला अखेर मंगळवारी झिम्बाब्वे विरुध्दच्या तिस-या सामन्यात सूर सापडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जी ओळख आहे, दबदबा आहे त्यानुसार ३५ वर्षीय गेलने खेळ करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकली.
आपल्या घणाघाती फलंदाजीने गेलने स्टेडियमवर, टीव्हीसमोर बसून सामना पाहणा-या प्रेक्षकांच्या नजरेचे पारणे फेडले. गेलने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकवणारा गेल चौथा फलंदाज ठरला तसेच अशी कामगिरी करणारा तो पहिला बिगरभारतीय फलंदाज आहे.
यापूर्वीचे व्दिशतक झळकवणारे तिन्ही खेळाडू भारतीय होते. गेलने १४७ चेंडूत २१५ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने रोहित शर्मा आणि एबीडीविलियर्सच्या सोळा षटकारांच्या विक्रमांची बरोबरी केली. गेलने १३८ चेंडूत व्दिशतकाला गवसणी घातली. विश्वचषकात व्दिशतक झळकवणारा गेल पहिला खेळाडू आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्दिशतकाची सुरुवात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून झाली. सचिनने पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिके विरुध्द ग्वालियर येथील सामन्यात पहिले व्दिशतक झळकावले होते. योगायोग म्हणजे सचिनने २४ फेब्रवारी २०१० रोजी पहिल्या व्दिशतकाची नोंद केली. गेलने व्दिशतकाची नोंद केली तो दिवसही २४ फेब्रुवारीचा आहे.
सचिननंतर भारताच्याच विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिज विरुध्द २१९ धावा फटकावल्या. त्यानंतर रोहित शर्माने सलग दोन वेळा व्दिशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक २६४ धावांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे.
व्दिशतकवीर
फलंदाज | धावा | चेंडू | चौकार | षटकार | प्रतिस्पर्धी | तारीख |
रोहित शर्मा | २६४ | १७३ | ३३ | ९ | श्रीलंका | १३-११-२०१४ |
विरेंद्र सेहवाग | २१९ | १४९ | २५ | ७ | वेस्ट इंडिज | ८-१२-२०११ |
ख्रिस गेल | २१५ | १४७ | १० | १६ | झिम्बाब्वे | २४-२-२०१५ |
रोहित शर्मा | २०९ | १५८ | १२ | १६ | ऑस्ट्रेलिया | २-११-२०१३ |
सचिन तेंडुलकर | २०० | १४७ | २५ | ३ | दक्षिण आफ्रिका | २४-२-२०१० |