कधी कधी व्हिसा मिळाल्यानंतर नेमकं काय करावं, हेच कळत नाही. तर कधी कधी कितीही वेळा अमेरिकेला गेलं तरी प्रत्येक वेळी नवनवीन समस्या निर्माण होतात. कधी व्हिसा संपलेला असतो तर कधी लग्नानंतर व्हिसावरचं नाव बदलायचं असतं.. असं बरंच काही. व्हिसाबाबत आपल्या मनात कितीतरी शंका निर्माण होतात. सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणा-या शंकांचं निरसन करण्याचा केलेला एक प्रयत्न..
माझा व्हिसा मान्य झालाय, आता पुढे काय आहे?
उत्तर : मुलाखत घेणारा अधिकारी मुलाखतीच्या शेवटी तुमचा व्हिसा मान्य झाल्याचं तुम्हाला सांगेल. मुलाखत संपल्यावर यूएस कॉन्सुलेटमधून तुम्ही लगेचच बाहेर पडाल. तुम्ही पावतीसुद्धा घेणार नाहीत. तुमचा पासपोर्ट आणि व्हिसा तुम्ही पूर्वी सांगितलेल्या स्थळावर (पिकअप लोकेशनला) येतो. हे लोकेशन किंवा ही जागा मुलाखतीची वेळ निश्चित करतानाच तुम्ही निवडलेली असते. संपूर्ण भारतात अशा ३३ जागा आहेत. कागदपत्रं पोहोचायला साधारणपणे चार ते पाच दिवस लागतात. तुमचा पासपोर्ट पूर्णत: तयार असून तो तुमच्या पिकअप लोकेशनवरून घेऊन जावा, असं सांगणारा एसएमएस किंवा ई-मेल तुम्हाला नक्कीच मिळतो.
तसंच घरच्या अथवा कार्यालयाच्या पत्त्यावर कुरिअरने पासपोर्ट पाठवण्याचीदेखील सोय आहे. पण त्यासाठी प्रति पासपोर्ट ३०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. घरच्या अथवा कार्यालयाच्या पत्त्यावर तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर यूएस कॉन्सुलेट किंवा ऑफसाइट फॅसिलिटेशन सेंटरमध्ये कुरिअरसाठी आवश्यक असलेली माहिती मागणारा फॉर्म भरून द्यावा लागेल. कागदपत्रं गोळा करण्याच्या जागेत बदल करायचा असल्यास मुलाखतीच्या दिवसापर्यंत संकेतस्थळावर अथवा कॉल सेंटरला रात्री ११.५९ पर्यंत फोन करून त्यात बदल करू शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास http://www.ustraveldocs.com/in/in-loc-passportcollection.asp या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
माझं लग्न झालंय. आणि माझा यूएस व्हिसा माझ्या जुन्या पासपोर्टमध्ये असून पासपोर्ट आणि व्हिसा माहेरच्या नावाने आहे. नवीन पासपोर्टमध्ये माझं नवीन नाव टाकलं आहे. तरी मला आता नवीन नावाने नवीन व्हिसा काढावा लागेल का?
उत्तर : नाही. त्याची काहीच आवश्यकता नाही. जोपर्यंत तुमचा सध्या अस्तित्वात असलेला वैध यूएस व्हिसा खराब होत नाही, तोपर्यंत तुम्ही तो व्हिसा अमेरिकेला जाण्यासाठी वापरू शकता. नवीन आणि जुना असे दोन्ही पासपोर्ट तसंच विवाह नोंदणी प्रमाणपत्रं सोबत बाळगून तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता. अधिक माहितीसाठी htttp://mumbai.usconsulate.gov/visas.html या संकेतस्थळावर संपर्क साधावा. संकेतस्थळासंदर्भात तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा असल्यास www.facebook.com/mumbai.usconsulateया संकेतस्थळावर जाऊन श्करअर नामक बटणावर क्लिक करा. ट्विटर वरुन संपर्क साधायचा असेल किंवा व्हिसासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास www.twitter.com/USAndMumbai या संकेतस्थळाला भेट द्या.