वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर शेन शिलिंगफर्डचे गोलंदाजीच्या आक्षेपार्ह शैलीबद्दल आयसीसीकडून निलंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याचा संघसहकारी मर्लान सॅम्युअल्सलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगात चेंडू टाकण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.
दुबई – वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर शेन शिलिंगफर्डचे गोलंदाजीच्या आक्षेपार्ह शैलीबद्दल आयसीसीकडून निलंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याचा संघसहकारी मर्लान सॅम्युअल्सलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगात चेंडू टाकण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. शिलिंगफर्डचा ऑफब्रेक चेंडू आणि दुसरा हे दोन प्रकारचे चेंडू टाकताना कोपरा १५ डिग्रीपेक्षा जास्त अंतरात वळतो, असे निरीक्षण आयसीसीने नोंदवले. आता जोपर्यंत शिलिंगफर्ड त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत आयसीसीच्या नियमांप्रमाणे सुधारणा करत नाही, तोपर्यंत त्याचे निलंबन कायम राहील, असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिलिंगफर्ड आणि सॅम्युअल्स या दोघांचीही गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार गेल्या महिन्यात मुंबईतील भारताविरुद्धच्या कसोटीच्यावेळेस करण्यात आली होती. त्यानुसार त्यांची पर्थ येथे बायोमेकॅनिकल अँनालिसिसद्वारे चाचणी घेण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांना न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटींमध्ये संधी देण्यात आली. मात्र चाचणीत दोषी आढळल्याने आता शिलिंगफर्डला न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित कसोटीत खेळता येणार नाही.
शिलिंगफर्डला याआधीही डिसेंबर २०१०मध्ये आक्षेपार्ह गोलंदाजीमुळे गोलंदाजी करण्यास आयसीसीकडून मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या शैलीची आयसीसीने तपासणी केली होती. त्यापाठोपाठ जून २०११मध्ये त्याची शैली योग्य असल्याचा निर्वाळा आयसीसीने दिला होता. ३० वर्षीय शिलिंगफर्डने आतापर्यंत १४ कसोटींत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. सॅम्युअल्सचा ऑफब्रेक चेंडू व्यवस्थित असल्याचा निर्वाळा आयसीसीने दिला. मात्र त्याचा वेगात पडणारा चेंडू योग्य नसल्याचे स्पष्टीकरण नोंदवण्यात आले.
दरम्यान, वेस्ट इंडिज न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटींच्या मालिकेत ०-१ पिछाडीवर आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी त्यांना शेवटची कसोटी जिंकणे गरजेचे आहे. त्यातच फॉर्मात असलेला शिलिंगफर्डची अनुपस्थिती ही विंडिजची चिंता वाढवणारी बाब आहे.