दिल्ली विधानसभेत भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आणि एल अँड टीचा अपेक्षेपेक्षा कमजोर तिमाही निकालाने बाजाराचा थरकाप उडाला.
मुंबई- दिल्ली विधानसभेत भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आणि एल अँड टीचा अपेक्षेपेक्षा कमजोर तिमाही निकालाने बाजाराचा थरकाप उडाला. सलग सातव्या सत्रात घसरणीची ‘री’ ओढत सेन्सेक्सने ४९० अंकांची डुबकी मारत २८,२२७.३९ हा तरन आठवडय़ांचा तळ गाठला.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १३४.७० अंकांची घसरण होऊन हा निर्देशांक ८,५२६.३५ या पातळीवर बंद झाला. ग्रीसच्या निमित्ताने युरोझोनमध्ये वाढती अस्वस्थताही कारणीभूत असून रुपयालाही त्याचा फटका बसला.
भांडवली वस्तू, धातू, वाहन, बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी आणि रिफायनरी यांच्यावर विक्रीचा सर्वाधिक भार राहिला. अपेक्षाभंग करणारी कंपन्यांची तिमाही कामगिरी आणि डिसेंबर तिमाहीतील जीडीपी आकडेवारी सादर होण्यापूर्वीची सावधानता यांचे बाजाराच्या व्यवहारांवर सावट राहिले. दिल्ली विधानसभेतील निकालाबाबत मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षाने बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली.
‘आप’चे दिल्लीमध्ये सरकार आल्यास लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळालेली ही पहिलीच जबरदस्त मात ठरणार असल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक यांनी म्हटले आहे.
अपेक्षेपेक्षा निराशाजनक तिमाही आकडेवारी जाहीर करणा-या एल अँड टीला (६.६१ टक्के) विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. सेन्सेक्समधील सर्वात घसरण झालेला हाच शेअर ठरला. एलअँडटीने तिस-या तिमाहीत ८.७ टक्के वाढीसह ८६६.५४ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली. सुरुवातच निराशाजनक झालेल्या सेन्सेक्सचा शेवटही तसाच झाला.
या निर्देशांकाने १६ जानेवारीनंतरची नीचांकी पातळी गाठली. टाटा स्टील ५.७९ टक्के, गेल आणि सेसा स्टरलाईटने ४.५३ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवत बाजाराची चिंता वाढवली. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि टाटा मोटर्स यांच्या शेअरमध्येही ३.६५ अंकांची घसरण झाली.
चीनमधील आयात आकडेवारीने आर्थिक विकासाबाबत चिंता उपस्थित केल्याने धातू शेअरला त्याची किंमत मोजावी लागल्याचे वेरासिटी ब्रोकिंग सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख जिग्नेश चौधरी यांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३०पैकी २४ शेअरमध्ये घसरण झाली.
रुपयाचीही गटांगळी
बँका आणि आयातदारांकडून डॉलरला वाढलेल्या मागणीचा सोमवारी रुपयाला फटका बसला. डॉलरसमोर रुपयाने ४८ पैशांची गटांगळी खात ६२.१७ हा चार सप्ताहांतील तळ गाठला. शेअर बाजारात सातत्याने होणारी घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे वधारणारे मूल्य रुपयावर परिणाम करणारे ठरत असल्याचे चलन बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुपयाने सुरुवातच ६२ पासून केली. शुक्रवारी हे चलन ६१.६९वर बंद झाले होते. याआधी १४ जानेवारी रोजी रुपयाने ६२.१८ची पातळी गाठली होती. जागतिक स्तरावरील कमजोरी आणि डॉलरचे वधारणारे मूल्य रुपयाच्या अवमूलनास कारण ठरत असल्याचे वेरासिटी ग्रुपचे सीईओ प्रमित ब्रह्मभट्ट यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये ‘आप’ला बहुमत मिळण्याचे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष, काही कंपन्यांची कमजोर तिमाही कामगिरी आणि जागतिक बाजारांतील संमिश्र संकेत यामुळे गुंतवणूकदारांना चिंतेत टाकले.
– राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनांझा पोर्टफोलिओ
‘..तर युरोझोन पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल’
ग्रीस बाहेर पडल्यास युरोझोन पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल, असा इशाराच ग्रीसचे अर्थमंत्री यानिस वाराऊफॅकिस यांनी दिला. युरोझोनमधून बाहेर पडणे हा आमच्या योजनेचा भाग नाही. कारण युरोझोन हा एका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आहे.
जर ग्रीसला यातून बाहेर काढल्यास सर्वच कोलमडून पडेल, असे वाराऊफॅकिस यांनी म्हटले आहे. इटालियन पब्लिक ब्रोडकास्टर आरएआयवरही मुलाखत प्रसारित झाली आहे. यामुळे जागतिक बाजारावर भीतीचे सावट निर्माण झाले आहे.