विश्वचषकापूर्वी सुरु असलेल्या सराव सामन्यांमध्ये बुधवारी पाकिस्तानने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला.
सिडनी – विश्वचषकापूर्वी सुरु असलेल्या सराव सामन्यांमध्ये बुधवारी पाकिस्तानने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला.
रंगतदार झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने सात चेंडू राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंडने ज्यो रुट (८५) आणि बॅलन्सच्या (५७) अर्धशतकांच्या बळावर २५० धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फारशी प्रभावी कामगिरी करु शकले नाहीत.
२५१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. धावफलकावर दोन धावा असताना नासीर जमशेदच्या रुपाने पाकिस्तानचा पहिला गडी तंबूत परतला होता.
संघाच्या ८० धावा होईपर्यंत पाकिस्तानचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर कर्णधार मिसबा उल हक आणि उमर अकमलच्या भागीदारीने पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गडयासाठी १३३ धावांची भागीदारी केली.
अकमल ६५ धावांवर बाद झाल्यानंतर मिसबा उल हकने शाहीद आफ्रिदीच्या साथीने पाकिस्तानचा विजय साकारला. मिसबा उल हकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत नाबाद ९१ धावा केल्या.