भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शुकवारी हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
हाँगकाँग – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शुकवारी हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सायनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतील महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
३९ मिनिटे चाललेल्या या खेळात तिस-या सीडेड सायनाचा चीन तैपेईच्या तै त्झू यिंगने १५-२१ आणि १९-२१ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सायनाने नुकतेच चीन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
स्पर्धेच्या पहिल्या गेममध्ये यिंगने सुरुवातीपासूनच जोरदार खेळ केला. २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. यिंगने आपली आघाडी सतत वाढवतच ठेवली.शेवटपर्यंत सायनाला ही पिछाडी भरुन काढण्यात अपयश आल्याने तिचा १५-२१ ने पराभव झाला.
पहिल्या गेममधील पराभवानंतर दुस-या गेममध्ये सायनाने जोरदार पुनरागमन केले. अंतिम क्षणापर्यंत दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेतील चुरस कायम ठेवली होती. १९-१९ अशी बरोबरी झाल्यानंतर यिंगने मिळालेल्या संधीचा फायदा घेत सायनावर मात केली आणि सलग दुसरा गेमही २१-१९ असा जिंकला.
तत्पूर्वी, महिला एकेरीच्या अन्य लढतीत सिंधूला जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून १७-२१, २१-१३, ११-२१ असा पराभवाचा स्वीकारावा लागल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.