कॉलेजात गेल्यावर सर्वात मोठा खर्च (कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यापेक्षाही जास्त!) कशावर होत असेल तर तो होतो पुस्तकांवर. आणि पुस्तकं विकत घेतली नाही तर इतरांकडून पुस्तकं उसनी आणून त्यांच्या झेरॉक्स काढण्यावर पैसे खर्च होतात.
कॉलेजात गेल्यावर सर्वात मोठा खर्च (कॅन्टीनमध्ये खाण्या-पिण्यापेक्षाही जास्त!) कशावर होत असेल तर तो होतो पुस्तकांवर. आणि पुस्तकं विकत घेतली नाही तर इतरांकडून पुस्तकं उसनी आणून त्यांच्या झेरॉक्स काढण्यावर पैसे खर्च होतात. पुन्हा नोट्स, प्रोजेक्टच्या झेरॉक्स काढण्याचा खर्च होतो तो वेगळाच. दरवेळी पॉकेटमनी काही एवढी महागडी पुस्तकं विकत घेण्यासाठी पुरत नाही. मग कधी कधी पुस्तकं ग्रुपमध्ये शेअर केली जातात. किंवा उधारीवर मागून आणली जातात. पण ऐन परीक्षेच्या वेळी तर कोणीही स्वत:चं पुस्तक देण्यासाठी नाहीच म्हणणार.
आता आपण सर्वच काही ‘थ्री इडियट’मधल्या चतुरसारखे अतिहुशार नसतो ना! तेव्हा आपल्यासाठी स्वत:ची पुस्तकं ही महत्त्वाची असतातच. तर दुस-यांकडून पुस्तकं मिळवण्यासाठीची ही सर्व खटपट आता सोडून द्या आणि ‘सेलबायबुक डॉट कॉम’ या संकेतस्थळावर डोकावून निर्धास्त व्हा. खास महाविद्यालयीन व शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणा-या पुस्तकांसाठी बनवलेले हे संकेतस्थळ प्रत्येक कॉलेज तरुणासाठी आशेचा किरणच जणू आहे. इथे इंजिनीअरिंग, मेडिकल, आयआयटीजी, जीई मेन्स, स्पर्धा परीक्षा, पदवी परीक्षा व इतर शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकं उपलब्ध आहेत.
या संकेतस्थळाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे तुम्ही तुमची जुनी पुस्तकं विकू शकता, तसंच विकत घेऊही शकता. कॉलेजच्या कोणत्याही शाखेतली किंवा वर्षातली पुस्तकं असली तरी ती इथे विकण्यासाठी मोफत जाहिरात टाकता येते. या जाहिराती वाचून विद्यार्थ्यांनाही पुस्तक निवडीचे पर्याय मिळतात. शिवाय या पुस्तकांवर सवलत देखील मिळते. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय इथे मनोरंजनासाठी खास कॉलेज तरुणांमध्ये लोकप्रिय असणारी प्रेम, स्फूर्ती, रहस्य, थरार इ. विषयांवर आधारित प्रसिद्ध लेखकांची पुस्तकंही विकायला आहेत.
पण त्यांची संख्या मर्यादित आहे, कारण अखेर हे अभ्यासासाठी निर्मिती झालेलं संकेतस्थळ आहे. संकेतस्थळावर जाऊन शोध घेण्यासाठी वेळ नसेल तर तिथं दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तुम्ही पुस्तकांची मागणी नोंदवू शकता. आपली जुनी पुस्तकं विकू इच्छिणारे विद्यार्थी आणि पुस्तकांची गरज असणारे विद्यार्थी यांच्यातला दुवा म्हणजे हे संकेतस्थळ असं म्हणायला हरकत नाही. ज्यामुळे पुस्तकांच्या दुकानात जाऊन घासाघीस करून महागडी पण जुनी पुस्तकं खरेदी करण्याचा, पुस्तकांच्या ढिगा-यात आपल्याला हवं ते पुस्तक शोधण्याचा विद्यार्थ्यांचा सर्व त्रास वाचणार आहे.
कारण या संकेतस्थळामुळे त्यांना हवी ती पुस्तकं घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तर मग सीनिअर्स, जुनी अभ्यासाची पुस्तकं किती दिवस घरात ठेवायची हा तुमचा प्रश्न आता ‘सेलबायबुक डॉट कॉम’ सुटलेला आहे. इथे केवळ खरेदी-विक्रीच चालते असं नाही तर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी इथे पुस्तकं विकावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करणा-या ‘कॅम्पस् अॅम्बॅसिडर’ विद्यार्थ्यांना आकर्षक मोबदलाही मिळणार आहे.