जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन्स व मेमरी चिप बनवणारी कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आता बॉस आणि त्याच्या हाताखालील कर्मचारी ही अधिकाराची उतरंड पद्धती बंद करण्याचे ठरवले आहे.
सेऊल – जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन्स व मेमरी चिप बनवणारी कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आता बॉस आणि त्याच्या हाताखालील कर्मचारी ही अधिकाराची उतरंड पद्धती बंद करण्याचे ठरवले आहे. कंपनीने आता स्टार्ट अपप्रमाणे कॉर्पोरेट संस्कृती आणण्याचे ठरवले असून वाढ मंदावल्याने आता अधिक चलाख धोरण स्वीकारले जाणार आहे.
सॅमसंगचे वरिष्ठ अधिकारी आता बॉसपासून ते सबऑर्डिनेट या पद्धतीपासून दूर जाण्याच्या शपथेवर स्वाक्षरी करणार असून कर्मचा-यांबरोबर खुला संवाद होण्याच्या दृष्टीने वातावरण तयार करण्यावर जोर दिला जाणार आहे. सॅमसंगमध्ये आता अधिकारांचे स्तर कमी केले जाणार असून व्यवसाय विभागप्रमुख आणि कर्मचा-यांमध्ये अधिकाधिक खुला संवाद केला जाणार आहे.
कंपनीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही अंतर्गत संस्कृतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने बदल करत असून खुलेपणे एकमेकांशी संवाद साधला जावा व सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन केले जावे, यासाठी हा निर्णय आहे. या पेचप्रसंगाच्या काळात कंपनीत आमूलाग्र बदल करण्यात येत असून १९९३ मध्ये सॅमसंगचे संस्थापक ली कुन्ही यांनी तुमची बायको व मुले वगळून सर्व बदला, असा जो संदेश दिला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत.
मात्र तीन लाख कर्मचारी असलेल्या कंपनीसाठी असा बदल तातडीने करणे अवघड असल्याचे काही कर्मचारीच सांगतात. आपली कार्यपद्धती बदलल्याने झटपट काम करणारी कंपनी असा लौकिक गमावला जाण्याची भीतीही विश्लेषक व्यक्त करतात. २०१४ मध्ये ली यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते रुग्णालयातच असून सध्या कंपनीची सूत्रे त्यांचा मुलगा जय ली यांच्या हाती आहेत.
कंपनीने कडक कॉर्पोरेट संस्कृती बदलण्याचे निर्णय घेतले असून त्यात कर्मचा-यांसाठी हवे ते कामाचे तास, ड्रेसकोडमध्ये शिथिलता आणि काम संपल्यावर चालणारी ड्रिंकिंग सेशनला हजेरी लावण्यासाठी कमी दबाव, असे काही निर्णयांचा त्यात समावेश आहे.