मुंबई शेअर बाजाराने सकाळच्या सत्रात चारशे अंशांची जोरदार उसळी घेत गुरुवारी दिवसाची सकारात्मक सुरुवात केली.
मुंबई– फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक रोखे खरेदी कमी करण्याचे काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. ज्यामुळे भारतासह प्रमुख शेअर बाजारांत मोठी पडझड झाली होती.
मात्र बुधवारी त्यांनी सौम्य पतधोरण महासत्तेसाठी आणखी काही काळ आवश्यक असल्याचे म्हटल्याने जागतिक बाजारात तेजी परतली. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स ३८२ अंकांनी वधारला आणि गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत १ लाख कोटींची भर घालून नुकसानीची एकप्रकारे परत‘फेड’ केली.
अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी आणखी काही काळ सौम्य पतधोरण राबण्याची गरज असल्याचे बेन बर्नान्के यांनी बुधवारी संकेत दिल्यानंतर त्याचे सकारात्मक पडसाद जगातील प्रमुख शेअर बाजारांवर पडले. यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८२ अंकांनी उसळा आणि १९,६७६.०६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ११८.४० अंकांची वाढ होऊन हा निर्देशांक ५,९३५.१०वर विसावला.
बाजारातील १३ पैकी १२ क्षेत्रांमध्ये तेजीचे निशाण फडकले. तब्बल १,३५८ शेअरच्या किमती वधारल्या, तर ९७४ शेअर घसरले. या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत १ लाख कोटींची भर घातली. चलन बाजारातही रुपयाने सकाळच्या सत्रात चांगली कमाई केली. बँकिंग, भांडवली वस्तू, रिफायनरी, सार्वजनिक कंपन्यांच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
कॉर्पोरेट कंपन्यांकडून लवकरच पहिल्या तिमाहीतील निकाल जाहीर केले जाणार आहेत. रुपयाच्या अवमूलनाने आयटी निर्यातदार कंपन्यांना फायदा होईल, या आशेने आयटी कंपन्यांच्या शेअरला बाजारात चांगली मागणी होती. आयटीतील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या निकालावर सर्वाच्या नजरा असून कंपनीने निराशा केल्यास निफ्टीत मोठी घसरण होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवालचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक किशोर ओसवाल यांनी व्यक्त केला.
सेन्सेक्समधील स्टरलाइट इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४.७८ टक्के, हिंदाल्को ४.७४ टक्के, एचडीएफसी बँक ३.३२ टक्के, भारती एअरटेल ३.२१ टक्के, कोल इंडिया ३.२१ टक्के, टीसीएस ३.१० टक्क्यांनी वधारले. तसेच आयटीसी २.१७ टक्के, टाटा स्टील १.९७ टक्के आणि आयसीआयसीआय बँक १.९१ टक्क्याची वाढ झाली. बर्नान्केंच्या विधानाने आशियाई बाजारात तेजी होती. चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांमधील प्रमुख शेअर बाजारांत १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
महासत्तेला सौम्य पतधोरणाची गरज
वॉशिंग्टन : अमेरिकन अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ कमी व्याजदरांचे परतधोरण आवश्यक असल्याचे मत फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील बेरोजगारी अजूनही जास्तच आहे. त्याचबरोबर फेडरलच्या लक्ष्यापेक्षाही महागाईचा पारा वरच्या पातळीवर आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी सौम्य पतधोरण आणखी काही काळ सुरूच ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते. गेल्या १०० वर्षात अमेरिकन अर्थव्यवस्थेत फेडरलच्या योगदानाची त्यांनी या वेळी माहिती दिली.
[EPSB]
सेन्सेक्स आठवडाभराच्या नीचांकावर
तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १४५ अंकांची घसरण झाली.
रुपयाला धीर
अवमूलन रोखण्यासाठी रिझव्र्ह बँक आणि सेबीकडून आक्रमक पावले उचलली गेल्यामुळे बुधवारी डॉलरच्या समोर रुपया ४९ पैशांनी वधारला.
[/EPSB]