गुंतवणूकदारांनी विक्री सुरूच ठेवल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३०.४४ अंकांनी घटून २८,०३२.८५ या स्तरावर बंद झाला.
मुंबई- उच्चांकी स्तरावर रुळणा-या सेन्सेक्स, निफ्टीकडे गेल्या दोन दिवसांपासून नफेखोरांनी नजर वळवली आहे. गुंतवणूकदारांनी विक्री सुरूच ठेवल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३०.४४ अंकांनी घटून २८,०३२.८५ या स्तरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३.६० अंकांची घट नोंदवत ८४००खाली म्हणजेच ८,३८२.३० वर बंद झाला.
बाजारात घसरण झाली असली तरी तत्पूर्वी दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे २८,२९४.०१ आणि ८,४५५.६५ या उच्चांकी स्तराला स्पर्श केला होता. बाजार दिवसभर घुटमळत राहिला आणि शेवटच्या ९० मिनिटांमध्ये विक्रीचा जोर वाढून त्यात घट झाल्याचे बोनांझा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले. टाटा मोटर्स, रिलायन्स, ओएनजीसी, सन फार्मा, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, एसबीआय, सेसा स्टरलाइट, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, भेल आणि कोल इंडिया यांचे शेअर दबावात राहिले. दरम्यान, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज लॅब, एल अँड टी, एचयूएल या शेअरमध्ये खरेदी झाली. दरम्यान, स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअरनाही विक्रीचा फटका बसला.
बाजाराने सुरुवात सकारात्मक केली. मात्र उच्च स्तरावर असलेल्या बाजारात नफेखोरीवर भर दिल्याने त्यांत घसरण झाल्याचे वेरासिटी ब्रोकिंग सव्र्हिसेसचे मुख्य संशोधक जिग्नेश चौधरी यांनी सांगितले.
रुपया ६२च्या समीप!
डॉलरसमोर सलग पाचव्या सत्रात काळवंडलेल्या रुपयाने बुधवारी साडेआठ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. डॉलरला तेल आयातदारांची वाढती मागणी आणि शेअर बाजारातील कमजोरीने रुपयाचे २२ पैशांनी अवमूल होऊन तो ६१.९६वर बंद झाला. तत्पूर्वी रुपयाने ६१.९९५०वर घसरला होता. अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या बैठकीचे इतिवृत्तांत जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर डॉलर प्रतिस्पर्धी सहा चलनाच्या तुलनेत स्थिर राहिला.
इन्फोसिसमध्ये ‘एफआयआय’ ४२.६७ टक्क्यांवर
इन्फोसिस हा परदेशी गुंतवणूकदारांच्या सर्वात पसंतीचा शेअर ठरत आहे. या शेअरमधील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा जुलै-सप्टेंबर या तिमाहीत हिस्सा ४२.६७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. हा गेल्या साडेनऊ वर्षातील उच्चांकी स्तर ठरला आहे. शेअर बाजारांतील आकडेवारीनुसार गेल्या वर्षी या तिमाहीत हा हिस्सा ३९.९३ टक्क्यांवर होता. याआधी मार्च २००५पर्यंत या गुंतवणुकीने या कंपनीतील आपला स्तर ४२.८७ टक्क्यांपर्यंत उंचावला होता.
नवे नवे शिखर सर करणा-या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बाजारांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा उच्चांकी स्तराला गवसणी घातली. बुधवारी सकाळीही सत्राची सुरुवात तेजीत झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये १३०.७२ अंकाची वाढ होत त्याने २८ हजार २९४.०१ या नव्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २९.७५ अंकांची वाढ होत त्याने आठ हजार ४५४ हा ऐतिहासिक स्तर गाठला.
यापूर्वी मंगळवारीही सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्सने २८ हजार २६०.६६ तर निफ्टीने आठ हजार ४४७.४० या स्तराला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर दिवसभरात शेअरबाजारात नफावसुली झाल्याने दोन्ही निर्देशांकाची शिखरावरून घसरण झाली.