अमेरिकेतील व्याजदर अपेक्षेपेक्षा लवकर वाढवले जाण्याची भीती निवळल्याने गुंतवणूकदारांनी गुरुवारी एकच जल्लोष केला. मात्र अखेरच्या टप्प्यात झालेल्या विक्रीने दिवसभरातील उच्चांकावरून हा निर्देशांक ५०० अंकांनी घसरला.
मुंबई- अमेरिकेतील व्याजदर अपेक्षेपेक्षा लवकर वाढवले जाण्याची भीती निवळल्याने गुंतवणूकदारांनी गुरुवारी एकच जल्लोष केला. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने दिवसभरात ३५० अंकांची झेप घेतली, पण लगेचच ब्लूचिप शेअरमध्ये आलेल्या विक्रीच्या लाटेने सर्व मुसळ केरात गेले आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या विक्रीने दिवसभरातील उच्चांकावरून हा निर्देशांक ५०० अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये १५२ अंकांची, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ५१.२५ अंकांची घट झाली.
सेन्सेक्सने दिवसभरात २८,९७८.७४ अंकांचा उच्चांकी स्तर गाठला. फेडरल रिझव्र्हच्या निर्णयाने मिळालेल्या दिलाशाने गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह संचारला. मात्र त्यानंतर नफेखोरीचा मार्ग पत्करणा-या गुंतवणूकदारांमुळे सेन्सेक्स दीडशे अंकांच्या घसरणीसह २८,४६९.६७वर बंद झाला.
निफ्टी ८,६३४.६५वर बंद झाला. दरम्यान, फेडरल रिझव्र्हच्या दिलाशानंतर वॉलस्ट्रीटवर नवा उत्साह निर्माण झाला. त्यातून प्रेरणा घेत आशियातील सर्वच शेअर बाजार तेजीसह बंद झाले. युरोपीय बाजारही तेजीसह व्यवहार करत होते. अॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी यांच्यावर विक्रीचा दबाव राहिला.