मुंबईकरांना ‘स्त्री स्वर’ ही अनोखी अशी शास्त्रीय संगीत रजनी ऐकण्याचा योग येतो आहे. या संगीत रजनीमध्ये सर्व स्त्री कलाकार सहभागी होत असून त्यात बेगम परवीन सुलताना आणि डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या ज्येष्ठ कलाकारांबरोबरच युवा बासरीवादक देबोप्रिया चॅटर्जी यांचा समावेश आहे.
‘स्त्री स्वर: द वॉइस ऑफ वूमेन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण टाटा कॅपिटलचे असून न्यू इंडिया इन्श्युरन्स आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. आऊटडोअर भागीदार म्हणून मिनीमिक्सचे पाठबळ लाभले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि व्यवस्थापन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांची आहे.
‘स्त्री स्वर’चे आयोजन महिलांचे सक्षमीकरण आणि होतकरू महिला संगीतकारांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाने केले जाते. बेगम परवीन सुलताना आणि डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या ख्यातकीर्त गायिकांनी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. देबोप्रिया चॅटर्जी या पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्य आणि ‘सखी’ नावाच्या सर्व महिला कलाकार असलेल्या सांगीतिक बँडमध्ये आघाडीच्या बासरीवादक आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, त्याशिवाय सुरमणी हा किताब आणि सहारा एक्सिलन्स अॅवॉर्ड्स आदी पुरस्कारांचा समावेश आहे. ‘स्त्री स्वर’ संगीत कार्यक्रमाची सुरुवात देबोप्रिया चॅटर्जी यांच्या बासरीवादनाने होणार असून त्यांना प्रसाद पाध्ये तबल्यावर साथ देणार आहेत.
त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या अतुलनीय प्रतिभेच्या गायिका डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर विश्वनाथ शिरोडकर आणि हार्मोनियमवर सीमा शिरोडकर साथ करणार आहेत. ‘स्त्री स्वर’ संगीत कार्यक्रमाची सांगता पतियाळा घराण्याच्या प्रख्यात गायिका आणि पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलाकार बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे.
त्यांना तबल्यावर पंडित मुकुंदराज देव, हार्मोनियमवर पंडित श्रीनिवास आचार्य, तानपु-यावर व गायनात शादाब एस खान साथ देणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.comया संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या वरळी येथील नेहरू सेंटर ऑडीटोरीयम (दूरध्वनी- २४९६४६८०) येथे १० एप्रिल २०१८ पासून संगीत रसिकांना उपलब्ध होणार आहेत.
>> दिनांक : १२ एप्रिल २०१८, गुरुवार
>> वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
>> स्थळ : नेहरू सेंटर सभागृह, वरळी